‘सोमेश्वर’ ऊसदराबाबत कुठलीही तडजोड करणार नाही : चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांचा विश्वास

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगाम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडेल. तसेच गत हंगामाप्रमाणे याही वर्षी कारखाना ऊस दराबाबत कुठलीही तडजोड करणार नसल्याचा विश्वास चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी व्यक्त केला .

श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या एक लाख एक हजार साखर पोत्याच्या पुजन प्रसंगी कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप बोलत होते. जगताप पुढे म्हणाले कि, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम सुरळीतपणे सुरु असून कारखान्याने १० डिसेंबर अखेर ९९ हजार ६४५ मे. टन ऊसाचे गाळप करून त्यामधून एक लाख एक हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून ९२ लाख ४१ हजार १७४ युनिट्सची वीज निर्मिती केली असून ६१ लाख ८३ हजार युनिट्सची विज विक्री केलेली आहे. तसेच कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पामधून सरासरी २८०.१२३ टक्केची रिकव्हरी राखत ४ लाख ९१ हजार ५५ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले आहे.

श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व सर्व प्रकल्प सुरुळीतपणे सुरु राहण्यासाठी सर्व सभासदांचे व कारखान्यातील कामगारांच्या सहकार्य लाभत असून कारखाना कार्यस्थळावर संपुर्ण तोडणी, वाहतूक यंत्रणा दाखल झाली असून कारखान्याने को- जन, डिस्टीलरी व साखर कारखाना हे सर्वच प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. कारखान्याची गाळप हंगाम २०१९ – २० ची एफआरपी प्रति मे. टन २ हजार ७८९ रुपये असून १५ डिसेंबर पर्यंत तोडणी झालेल्या उसाचे एफआरपीपोटी ऐंशी टक्के रक्कम २७ डिसेंबर रोजी सभासदाच्या खात्यावर वर्ग करणार असून उर्वरित वीस टक्के रक्कम नंतरच्या टप्यात वर्ग करणार असल्याचे चेअरमन जगताप यांनी सांगितले.

जगताप पुढे म्हणाले कि, एफआरपी वर कमी पडणाऱ्या रक्कमेवर शासन निर्णयाप्रमाणे व्याज देण्याचा निर्णय संचालक मंडळाने बैठकीत घेतला आहे. तसेच गत हंगामाप्रमाणे याही वर्षी कारखाना ऊस दराबाबत कोठलीही तडजोड करणार नसून जिल्ह्यातील इतर कारखान्यांसोबत अंतिम ऊसदराबाबतीत सोमेश्वर कमी पडणार नसून सभासदांनी इतर कारखान्यास ऊस न घालता आपल्या सोमेश्वर कारखान्यासच घालून सहकार्य करावे असे आवाहन जगताप यांनी केले.

यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी व कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन शैलेश रासकर यांनी मानले.

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like