विधानसभा 2019 : श्रीगोंद्यात पाचपुतेंचं गुडघ्याला ‘बाशिंग’ मात्र आ. जगताप-नागवडेंच्या भुमिकेवर राजकीय ‘गणिते’ अवलंबून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे हे सध्या बघ्याच्या भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. नागवडे-जगताप हे एकदिलाने काम करतात की वेगळे राहतात, यावरच श्रीगोंद्याचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात श्रीगोंदा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट, श्रीगोंदा नगरपालिका व नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांचा समावेश होतो. त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात नगर तालुक्यातील मतेही निर्णायक आहेत. साकळाई पाणी योजनेच्या माध्यमातून अनेक वर्षे नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पाण्याचे गाजर दाखवले. प्रत्यक्षात ही योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. निवडणुकीच्या काही दिवस अगोदर साकळाई योजनेची चर्चा झाली. परंतु आचारसंहिता लागताच सर्व नेते व या योजनेसाठी लढणाऱ्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांना त्या योजनेचा विसर पडला आहे. श्रीगोंद्याचे राजकारण फोडाफोडीचे अधिक आहे. त्यामुळे शेवटपर्यंत उत्सुकता ताणली जाते. निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्यातही किंवा काही शेवटच्या दिवसातही राजकीय समीकरणे बदलतात. त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाबद्दल आत्ताच सांगणे अडचणीचे ठरेल.

गेल्या 57 वर्षांत फक्त चारच व्यक्ती येथून आमदार म्हणून निवडून आल्या. गेल्या 40 वर्षांत माजी मंत्री बबनराव पाचपुते, शिवाजीराव नागवडे व राहुल जगताप हे तीनच आमदार मतदारसंघाने दिले. साखर कारखानदारी संबंधित असलेली ही तीन घराणीच श्रीगोंद्यातील राजकीय सत्ताकेंद्रे बनली आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपची मोठी लाट असतानाही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे बबनराव पाचपुते यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. अनेक वर्षांपासून त्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची देणी ठरवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाचपुते यांच्यावर प्रचंड रोष असल्याचा फायदा विरोधकांना मिळाला. नागवडे यांनी शरद पवार यांच्या मध्यस्थीने राहुल जगताप यांना साथ दिली. त्यामुळे आपोआपच राहुल जगताप हे आमदार झाले. अवघ्या 26 व्या वर्षी त्यांना आमदार होण्याची संधी मिळाली. ते आता पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र अंतिम निर्णय काही होऊ शकला नाही.

माजी मंत्री बबनराव पाचपुते हे गुडघ्याला बाशिंग बांधून प्रचाराच्या कामाला लागले आहेत. मात्र विद्यमान आमदार राहुल जगताप व राजेंद्र नागवडे हे अजून राजकीय हालचालीवर लक्ष ठेवून बघ्याच्या भूमिकेत आहेत.

भाजपने जरी पाचपुते यांना उमेदवारी दिली, तरी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णा शेलार व भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते त्यांचा प्रचार करणार का, हा संशोधनाचा विषय आहे. बबनराव पाचपुते यांचे बंधू सदाशिव पाचपुते हे पूर्वीसारखे राजकारणात सक्रिय नाहीत. त्यामुळे सध्या पाच बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रम पाचपुते, पत्नी प्रतिभा पाचपुते हेच तयारीला लागले आहेत. अजूनही अनेक शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची देणी थकलेली आहेत. त्या रोषाचा सामना पाचपुते कसे करतात हाही संशोधनाचा विषय आहे. नागवडे यांची राजकीय भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. राजेंद्र नागवडे, आ. राहुल जगताप हे एकदिलाने विचार करतात की वेगळा विचार करतात, यावरच श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची राजकीय गणित अवलंबून आहे.

Visit : policenama.com