श्रीगोंद्यात राजकीय भूकंपाची शक्यता, आ. जगताप- नागवडे मुंबईत तळ ठोकून !

श्रीगोंदा : पोलीसनामा ऑनलाइन (गणेश कविटकर) – श्रीगोंद्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व विद्यमान आमदार राहुल जगताप या जोडगोळीने आज मुंबई गाठत भाजप उमेदवारीबाबत जोरदार हालचाली सुरू केल्या आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तसे झाल्यास गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची मोठी अडचण होऊ शकते.

विधानसभा निवडणूक जाहीर झाली. मात्र निवडणुकीत म्हणावी, तशी रंगत अद्याप आलेली नाही. मागील वेळी भाजपकडून उमेदवारी केलेल्या माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी यावेळीही आपल्यालाच भाजपची उमेदवारी आहे, असे गृहीत धरून कामाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. भाजप अंतर्गत काही नेत्यांचा पाचपुते यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा आहे. ही बाब लक्षात घेऊनच राजेंद्र नागवडे व आ. राहुल जगताप यांनी भाजप पक्षात प्रवेश करून उमेदवारी करण्याबाबत प्रयत्न सुरू केले आहेत.

आतापर्यंत या दोन्ही नेत्यांनी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन दोघांपैकी कुणालाही उमेदवारी द्या, अशा प्रकारचे साकडे घातले आहे. मात्र मंत्री विखे यांनी थांबा आणि पहाचा सल्ला दिला आहे. लोकसभा निवडणुकीत माजीमंत्री पाचपुते यांनी खा. डॉ. सुजय विखे यांच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केल्याने त्याची उतराई करण्यासाठी मंत्री विखे यांनी पाचपुते यांच्याच नावाची शिफारस केल्याचे समजते. मात्र असे जरी असले, तरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माजी मंत्री पाचपुते यांना उमेदवारीबाबत झुलवत ठेवले आहे.

आ. राहुल जगताप व राजेंद्र नागवडे हे सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. सायंकाळी चार वाजता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री त्यांना काय शब्द देतात याकडे आता तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

Visit : policenama.com