नगरसेवकपदाच्या अपात्रतेप्रकरणी सुनावणीला छिंदमचा वेळकाढूपणा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी महापालिकेने घेतलेल्या ठरावाची नगरविकास मंत्रालयात सुनावणी सुरू आहे. वेळकाढूपणा करण्यासाठी श्रीपाद छिंदम याने तडीपार असल्याने महत्वाची कागदपत्र मिळत नसल्याचे कारण सांगत सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर छिंदम याला अपात्र करण्यात यावे, असा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी नगरसेवक श्रीपाद छिंदम याचे पद रद्द करावे, असा ठराव करून तो नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आला होता. त्या प्रस्तावावर नगरविकास मंत्रालयात सुनावणी सुरू आहे. या घटनेनंतर अहमदनगर महानगरपालिकेची पुन्हा निवडणूक झाली. त्यात श्रीपाद छिंदम पुन्हा निवडून आलेला आहे. मात्र मागील नगरसेवक पद रद्द व्हावे, यासाठी नगर विकास खात्याकडे अजूनही सुनावणी सुरूच आहे.

यासाठी काल महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग व नगरसचिव हे नगरविकास मंत्रालयात गेले होते. मात्र तेथे श्रीपाद छिंदम यांच्यावतीने अर्ज देण्यात आला होता की, ‘सध्या नगर शहरात तडीपार असल्याने आवश्यक ती कागदपत्रे सादर करू शकत नाही. त्यामुळे सुनावणीची तारीख पुढे ढकलावी.’ त्यामुळे आता सुनावणीसाठी पुढची तारीख देण्यात येणार आहे. नेमकी कोणत्या तारखेला सुनावणी होणार आहे, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

आरोग्यविषयक वृत्त –