ए. टी. पाटलांचा पत्ता कट ; जळगावात आ.स्मिता वाघ यांना भाजपची उमेदवारी  

जळगाव  : पोलीसनामा ऑनलाईन (सुरज शेंडगे) – जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्याठिकाणी विद्यमान खासदाराला भाजप दणका देणार याची चर्चा खूप दिवसापासून रंगत होती. त्याच चर्चेला भाजपने काल मूर्त रूप दिले आहे. भाजपने जळगावमध्ये विद्यमान खासदार ए. टी. नाना पाटील यांचे तिकीट कापून त्या ठिकाणी विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.

जळगाव लोकसभेसाठी आमदार स्मिता वाघ यांच्यासह त्यांचे पती उदय वाघ यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र भाजपने स्मिता वाघ यांची विधान परिषदेतील बेतोड कामगिरी बघून त्यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. स्मिता वाघ, उदय वाघ यांच्या सह गिरीश महाजन आणि त्यांच्या पत्नीच्या नावाची देखील या मतदारसंघासाठी चर्चा होती. तसेच पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त साहेबराव पाटील यांच्या देखील नावाची चर्चा होत होती.

स्मिता वाघ या भाजपच्या निष्ठावान कार्यकत्या असल्याने त्यांना हि उमेदवारी मिळाली आहे. तसेच त्यांचे पती उदय वाघ हे भाजपचे जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचा जिल्हाभर असणारा संपर्क स्मिता वाघ यांच्या प्रचाराच्या कमी येणार आहे. तर दुसरीकडे ए. टी. पाटील यावेळी उमेदवारी मिळाल्यानंतर हॅट्रिक करण्याच्या तयारीत होते परंतु त्यांचे तिकीट कापण्यात आले. कारण त्यांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारसंघात व्हायरल करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला ब्रेक लागणार या बाबतचे  कयास येथील लोकांनी बांधले होते. त्यानुसार ए. टी. पाटलांचा भाजपने पत्ता कट केला आहे.