वर्षे सरली तशी ‘या’ मंत्रिणीबाईचे शिक्षण झाले कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माणूस वेगवेगळा व्यवसाय करत असला तरी त्याला शिक्षणाची आवड असेल तर तो कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकतो. वय वाढत जाते तसे त्यांचे शिक्षण, पदव्या वाढत जातात. पण त्याला राजकारणी अपवाद असतात. त्यांची वये जशी वाढत जाता. तसे त्यांचे शिक्षण कमी कमी होत जाते.

स्मृती इराणी यांचे २००४ मध्ये त्यांचे बी.ए. झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी दिल्लीच्या मुक्त विद्यापीठातून बी. काॅम. पार्ट १ चे शिक्षण घेतल्याचे सांगितले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात मनुष्य बळ विकास मंत्री म्हणून शपथ घेतल्यावर आपण येल विद्यापीठाचे पदवीधर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पाच वर्षे गेल्यावर आता २०१९ मध्ये त्यांनी आपण बी कॉम पार्ट १ चा ३ वर्षांचा कोर्स पूर्ण केला नसल्याचे नमूद केले आहे. आहे की नाही गंमत वय वाढत जाते तसे शिक्षण कमी कमी होण्याचा चमत्कार राजकारणीच करु शकतात.

स्मृती इराणी यांनी गुरुवारी अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहूल गांधी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या शिक्षणावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे शिक्षण, त्यांची पदवी कायमच वादात राहिली आहे. ५ वर्षापूर्वी त्यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा त्यांनी आपण परदेशातील येल विद्यापीठाच्या पदवीधर असल्याचे सांगितले होते. इराणी यांनी २००४ आणि २०१४ मध्ये निवडणुक अर्ज दाखल करताना वेगवेगळी माहिती दिली होती. त्यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री झाल्यावर त्यांच्या शिक्षणावरुन टीका झाली होती.

२००४ मध्ये इराणी यांनी चांदणी चौक मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी आपण बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याची माहिती दिली होती. २०१४ मध्ये अमेठी मतदारसंघातून निवडणुक लढविताना इराणी यांनी आपण दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून १९९४ मध्ये बी. कॉम. पार्ट १ चे शिक्षण घेतल्याचे नमूद केले होते. आता २०१९ मध्ये त्यांनी आपण दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून बी कॉमची प्रथम वर्षाची परिक्षा दिली. मात्र, तीन वर्षाचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले नाही. अशी माहिती इराणी यांनी शपथपत्रातून दिली आहे. एखादा मंत्री आपल्या स्वत: च्या शिक्षणाची अचूक माहिती देऊ शकत नाही. आपण बीए आणि बी कॉम यापैकी कोणत्या शाखेचे शिक्षण घेतले हे नीट सांगू शकत नाही़ असे मंत्री मनुष्य बळ विकास मंत्री म्हणून काम करीत होते. यावरुन विरोधकांना नवे कोलीत मिळाले आहे. स्मृती इराणी यांच्या शिक्षणावरुन पुन्हा वाद रंगण्याची शक्यता आहे.