‘त्या’ वक्तव्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मोभारकरांवर कारवाईची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मिलिंद मोभारकर याने मुकुंदनगरमधील नागरिकांना पाकिस्तानधार्जिणे संबोधून निवडणुकीच्या काळात शहराची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मोभारकर यांचे पोलीस संरक्षण काढून घेत त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुकुंदनगर येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात रहिवाशांनी म्हटले आहे की, ‘शहरात सध्या लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत मिलींद मोभारकर हा समाजकंटक सोशल मिडीयावर मुस्लिमबहुल मुकुंदनगरातील नागरिकांना पाकीस्तान धर्जिणे संबोधून निवडणुकीच्या काळात शहराची शांतता व सुव्यवस्थेत बिघाड करण्याच्या प्रयत्न जाणून करीत आहे, असे स्पष्ट होते. शहरात आतापर्यंत सर्व उमेदवार शांततेत आपआपला प्रचार करीत आहे. हे समाजविघातक प्रवृतीच्या मिलींद मोभारकर यास पचनी पडत नाही. मिलींद मोभारकर यांचा इतिहास ही अशा प्रकारचे विधान करुन समाजिक सलोख्याला बाधा पोहोचविण्याचा राहीलेला आहे. याबाबत प्रशासनाने आमच्या अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कायदेशीर कारवाई करुन मिलींद मोभारकरा यास तातडीने अटक करावी.

milind-mobharkar

निवडणूक आयोगाने समाजविघातक वक्तव्य करणा-या राजकीय नेते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ व माजी मुख्यमंत्री मायावती, आजमखानसारख्या नेत्यांनाही प्रचारबंदी केली आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मिलींद मोभारकर यास मागील चार वर्षांपासून पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. सदरची व्यक्ती ही समाजविघातक कृत्य करीत आहे. यापूर्वी त्याच्यावरील गुन्ह्यामुळे सिध्द होते.

गुन्हेगारांचे समाजविघातक कृत्य करणाराचे पोलीस संरक्षण ताबडतोब काढून घेण्यात यावे. मुकुंदनगरची बदनामी करणा-या समाजकंटक मिलींद मोभारकर यास तातडीने अटक करण्यात यावी’, अशी मागणी करण्यात आली आहे.