दुष्काळामुळे होरपळलेल्या कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दुष्काळ व वाढत्या कर्जाला कंटाळून तालुक्यातील शेतकर्‍याने जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यातील साकत येथे आज ही दुर्दैवी घटना घडली.

चंद्रकांत शंकर अडसूळ (वय ५५) हे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, आडसूळ यांनी दोन वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नासाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. दुष्काळी परिस्थितीमुळे आडसूळ हे सावकाराचे कर्ज फेडू शकले नाही. सेंट्रल बँक ऑफ इंडिया व सेवा सहकारी सोसायटीचे कर्जही त्यांच्या नावे होते. वाढत चाललेले कर्ज व सततची दुष्काळी परिस्थितीमुळे ते तणावात होते. आज सकाळी अडसूळ हे शेतातून दूध घेऊन घरी आले. दूध डेअरीत घातले. त्यानंतर पुन्हा शेतात जातो, असे म्हणून जनावरांच्या गोठ्यात गेले. तेथे गोठ्यातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अडसूळ यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार शेजारी राहणार्‍या ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यांनी मयताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. तसेच जामखे पोलिसांना कळविले. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.