भाजप उमेदवार डाॅ. सुजय विखेंना फुटला ‘घाम’ ; नगरमध्ये मुख्यमंत्र्यांची पुन्हा सभा

इराणी, मुंडेंच्याही होणार सभा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांना चांगलाच घाम फुटला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही सभा झाली होती आता पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांसह केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभा होणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्या शनिवारी (दि. 20) कर्जत येथे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची शनिवारीच शेवगाव येथे जाहीर सभा होणार आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची रविवारी (दि. 21) जामखेड येथे जाहीर सभा होणार आहे. ही सांगता सभा असेल.

तिसर्‍या टप्प्यात होत असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील निवडणुकीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. या मतदार संघात काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. ती सभा फारशी करिष्मा करू न शकल्याने पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगर तालुक्यातील वाळकी येथे सभा झाली. ही सभा प्रभाव पाडू शकली नाही. सभेतील गर्दी व कार्यकर्त्यांचा उत्साह निराशजनक होता.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे स्टार प्रचारक असल्याने त्यांच्याही सोयीनुसार जिल्ह्यात सभा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना नगर लोकसभा मतदारसंघात सभा घेण्याची वेळ आली आहे. पक्ष बदलाचा मोठा फटका बसणार असल्याने त्यांना चांगलाच घाम फुटला आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून बड्या नेत्यांच्या सर्वांसाठी खास आग्रह धरला जात आहे. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान तब्बल तीन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मतदारसंघात आलेले असतील. आतापर्यंत दोनदा आले आहेत, त्यांची आणखी एक सभा आहे. वारंवार बड्या नेत्यांना नगर मतदारसंघात येण्याची वेळ येणे, यातून भाजप किती अस्वस्थ आहे हे उघड होते. असे कार्यकर्त्यांमधून बोलले जाऊ लागले आहे.