निष्ठावंतांना डावलल्यास वेगळा विचार करू, झावरे यांचा राष्ट्रवादी पक्षनिरीक्षकांना इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पक्ष वाढविण्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहोत. परंतु, आता विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काहीजण ऐनवेळी पक्षात आले आहेत. निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांचा उमेदवारीसाठी पक्षाने विचारकेल्यास आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असा सणसणीत इशारा आज दुपारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी राष्ट्रवादीचे निरीक्षक विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील व अंकुश काकडे यांना दिला आहे.

राष्ट्रवादी भवन येथे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. पारनेर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले निलेश लंके हे उमेदवारीसाठी जोरदार आग्रही आहेत. त्यामुळे संतापलेल्या व विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सुजित झावरे यांनी पक्षनिरीक्षकांना त्यांचा विचार करू नये, असा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

झावरे म्हणाले की, पक्षाचे झाड वाढण्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहोत. परंतु आता झाडाला फळे आली म्हणून ती तोडून त्याचा आस्वाद बाहेरून आलेले व्यक्ती घेणार असतील, तर त्याचा आम्हा सर्व निष्ठावंतांना गांभीर्याने विचार करावा लागेल. पक्ष जर अशा बाहेरून आलेल्या इच्छुकांचा विचार करणार असेल, तर आम्हालाही पक्षाबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी निरीक्षकांना दिला आहे.

झावरे यांनी राष्ट्रवादी भवनात सर्वांसमोर इशारा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पक्षश्रेष्ठी यावर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. झावरे यांचे उत्तर आता चांगलाच चर्चेचा विषय ठरले आहे.