‘खडकवासल्या’त मताधिक्य घटल्याने आता ‘ताई’ जोरात सक्रिय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा मताधिक्य घटल्याचे लक्षात झाल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी आता खडकवासला मतदारसंघातील कात्रज, आंबेगाव, धनकवडी, धायरी या शहरी परिसरातील रखडलेले प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. शिवाय पक्षांतर्गत गटबाजीला लगाम घालण्यासाठी प्रत्येकावर विकासकामांकडे लक्ष देण्याची ‘कामगिरी’ सोपवल्याची चर्चा आहे.

यंदा बारामती लोकसभेत मोडणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात लोकसभेला भाजपच्या पारड्यात जादा मते पडली आहेत. गेल्या लोकसभेला सुप्रिया सुळे यांना २७ हजार मते कमी मिळाली होती; पण यंदा या मतदारसंघातून कांचन कुल यांना जवळपास ६६ हजार मतांची आघाडी मिळाली आहे.
परिणामी ही बाब राष्ट्रवादीसाठी गंभीर ठरली आहे आणि आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. त्यात या मतदारसंघात भाजपची ताकद वाढत असल्याचे आता अधोरेखित झाल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्या-ज्या भागात पाणी, रस्ते, कचरा, अतिक्रमणे यांचे प्रश्न रखडलेले आहेत. ते सोडविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी कृती आराखडा तयार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. कात्रज, धनकवडी, आंबेगाव, धायरी यासारखा सोसायट्यांनी वेढलेला बहुतांश भाग या मतदारसंघात येतो.

गेल्या दोन-तीन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भाजपला मताधिक्य मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी पर्यायाने खासदार सुप्रिया सुळे या सतर्क झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भागातील छोट्या-छोट्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने सुळे यांनीआतापासूनच पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांना ‘साकडे’ घालून या समस्यांचे निराकरण तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान या भागात भाजपची ताकद का वाढत आहे याबरोबरच कोणते मुद्दे पक्षाला अडचणीत आणत आहेत आणि नागरिकांचा कल काय आहे यावरही राष्ट्रवादीच्या गोटातून लक्ष देण्यात येणार असल्याचे समजते. त्यात विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून जे-जे इच्छुक तिकिटासाठी आग्रही असतील, त्यांनी त्यांच्या भागातून किती मताधिक्य दिले आणि या मतदारसंघासाठी, पक्षवाढीसाठी काय काय केले याचा ‘हिशोब’ ही घेतला जाणार असल्याने आतापासूनच इच्छुकांचे धाबे दणाणले आहे.