बारामतीचे ‘महात्म्य’ राखण्यात सुप्रिया सुळेंना आले ‘यश’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी १लाख ५५ हजार ७७४ मतांनी विजय मिळवित विजयाची हॅटट्रीक केली आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी पवार यांना भानावर आणले होते. मताधिक्यात मोठ्या प्रमाणावर घट होऊन सुप्रिया सुळे या ६९ हजार ७१९ मतांनी निवडून आल्या होत्या. त्यानंतर सावध झालेल्या सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघाशी सातत्याने संपर्कात राहून गेल्या वर्षभरापासून तयारी सुरु केली होती. त्यामुळे भाजपाने कितीही वल्गना केल्या तरी दणदणीत विजय मिळविण्यात त्यांना यश आले. त्याचबरोबर पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार हे बारामतीचे महात्म्य राखण्यात त्यांना यश आले.
बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या एकूण १२ लाख ९९ हजार २६१ मतांपैकी सुप्रिया सुळे यांना ६ लाख ८६ हजार ७१४ मते मिळाली. कांचन कुल यांनी ५ लाख ३० हजार ९४० मते मिळविली. वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर यांनी ४४,१३४ मते घेतली.

गेल्या वेळी सुप्रिया सुळे यांचा ६९ हजार७१९ मतांनी विजय झाला होता. यंदाच्या वेळी भाजपाने सुळे यांच्याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली होती. ‘बिटिया को हराना है’ असा संदेश खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे, त्यामुळे बारामती मतदारसंघात डेरेदाखल असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहूल कुल यांच्या पत्नी आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या कांचन कुल यांना भाजपाने उमेदवारी दिली. भाजपाच्या या ‘कुल’ खेळीने चुरशीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, बारामती आणि इंदापूरने भाजपाच्या अपेक्षांना सुरूंग लावला.

बारामती विधानसभा मतदारसंघातून सुळे यांना तब्बल १लाख २७ हजार ९१८ मतांचे अधिक्य मिळाले. सुळे यांना १, ७४,९८६ तर कुल यांना केवळ ४७,०६८ मते मिळाली. इंदापूरमध्येही कॉँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांनी आघाडी धर्माचे पालन केले. सुळे यांना येथून ७०,९३७ मताधिक्य मिळाले. त्यांना १, २३, ५७५ तर कुल यांना ५२,६३८ मते मिळाली.

भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघात कॉँग्रेसकडून दगाफटका झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मतमोजणीपूर्वीच तेथील राष्ट्रवादीचे नेते विधानसभेत जागा दाखवून देऊ असे म्हणू लागले होते. परंतु, भोरमध्ये सुळे यांना गेल्या वेळीइतकेच १९,५०४ मताधिक्य मिळाले. सुळे यांना १ लाख ९ हजार १६३ तर कुल यांना ९०,१५९ मते मिळाली.

खडकवासला मतदारसंघाने यंदाही राष्ट्रवादी काॅंग्रेसला फटका दिला. सुळे यांना खडकवासल्यातून तब्बल ६५,५२४ मते कमी पडली. कुल यांना १,५२,४८७ मते मिळाली. सुळे यांना ८६,९६३ मतांवर समाधान मानावे लागले.

दौंड या कुल यांच्या घरच्या मतदारसंघाने त्यांना मोठे मताधिक्य दिले नाही. येथून त्यांना केवळ ७ हजार ५७ मतांचे मताधिक्य मिळाले. कुल यांना ९१,१७१ तर सुळे यांना ८४, ११४ मते मिळाली. पुरंदरमध्येही जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी आघाडी धर्माचे पालन करत कुल यांना १५,५०४ मतांची आघाडी दिली. कुल यांना ९५,१९१ तर सुळे यांना ७९,६८७ मते मिळाली. मागील निवडणूकीत सुप्रिया सुळे यांना अपक्षेतरित्या मतदान कमी झाले होते. तेव्हापासून सुप्रिया यांनी संपूर्ण मतदार संघ पिंंजून काढण्याचा निर्धार केला.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची एकजूट करून संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून मतदार संघातील गावनगाव पिंजून काढले होते. बचत गटातील महिलांचा संपर्क भीमथडी यात्रेचे आयोजन, बेटी बचाव यात्रा, विद्यार्थिनींना सायकल वाटप अशा विविध उपक्रमातून त्यांनी संपर्क वाढविण्यावर भर दिला होता. पदाधिकाऱ्यांची ताकद, शिस्तबद्ध व नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा, तरूणाईशी वाढविलेला संपर्क याचाही त्यांना फायदा झाला. खास करून दुष्काळी भागात संपर्क ठेवण्यास त्यांनी प्राधान्य दिले होते. संसदेतील उपस्थिती त्यांनी विचारलेली प्रश्न यामुळे त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाला होता. या सर्वांचा फायदा घेत त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघात विजयाची हॅटट्रीक नोंदविली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या विजयात प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून दाखविलेली एकजूट मताधिक्य वाढविण्यास कारणीभूत ठरली. गेल्या निवडणुकीनंतर सुरुवातीपासून जनसंपर्क; लोकांचे प्रश्न, समस्यांवर सोडविण्यावर भर सुप्रिया सुळे यांनी दिला होता. दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, तरुणाईशी थेट संवाद ठेवण्याचा फायदा झाला. गेली पाच वर्षे विविध कार्यक्रम व उपक्रमांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. महाविद्यालयीन विद्यार्थी संघटना तसेच तरूणाईशी असलेल्या संपर्क, सोशल मिडीयाचा प्रभावी वापर निर्णायक ठरला़ बहुतांश सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे तुलनेने राष्ट्रवादीचा अधिक जनसंपर्क आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या तुलनेने सहकारी संस्थांवर पवार
कुटुंबाचे वर्चस्व आहे. गेल्या ५ वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रभावी जनसंपर्क ठेवला. नवख्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा दौंड वगळता इतरत्र थेट कमी जनसंपर्क कमी होता़ त्यामुळे भाजपावरच त्यांचा भर होता. तो मतदारांना आकर्षित करण्यात कमी पडला.
………………
जागा – सुप्रिया सुळे – कांचन कुल
दौंड – ८४११४ – ९११७१
इंदापूर – १२३५७५ – ५२६३८
बारामती – १७४९८६ – ४७०६८
पुरंदर – ७९६८७ – ९५१९१
भोर – १०९१६३ – ९०१५९
खडकवासला – ८६९६३ – १५२४८७

नाव – पक्ष – मते – टक्के
कांचन कुल (भाजप) 530940 40.69%
अ‍ॅड. मंगेश वनशीव (बसपा) 6882 0.53%
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) 686714 52.63%
दशरथ राऊत भा. प्र. 3822 0.29%
नवनाथ पडळकर वंचित 44134 3.38%
युवराज भुजबळ जनअधिकार 908 0.07%
सविता काजळे हि. ज. प. 798 0.06%
संजय शिंदे बहुजन 4345 0.33%
अलंकृत आवाडे-बिचकुले अपक्ष 844 0.06%
उल्हास चोरमले अपक्ष 1993 0.15%
अ‍ॅड. गिरीश पाटील अपक्ष 1087 0.08%
दीपक वटविसणे अपक्ष 1871 0.14%
डॉ. बाळासाहेब पोळ अपक्ष 1003 0.08%
विजयनाथ चांदेरे अपक्ष 1721 0.13%
विश्वनाथ गराडे अपक्ष 1158 0.09%
शिवाजी नंदखिले अपक्ष 4407 0.34%
सुरेशदादा वीर अपक्ष 3284 0.25%
हेमंत कोळेकर-पाटील अपक्ष 951 0.07%
नोटा – 7868 0.06%