धुळे : शिरपुर गावात ४ लाखांची घरफोडी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे तालुक्यात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून काही दिवसांपूर्वी रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांना सोनसाखळी चोरट्यांनी टार्गेट केले होते. हा प्रकार थोडा कमी होत नाही तोच चोरट्यांनी घरांना आपले टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. शिरपुर गावातील महादेव मंदिर परिसरातील घरातून पावणेचार लाख रुपयांचे सोन्यांचे दागिने घरफोडी करून चोरून नेले.

सरला सुखदेव शिंदे (वय-३३) यांनी शिरपुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरला शिंदे या शिरपुर गावात किशोर शिरसाठ यांच्या घरामध्ये भाड्याने राहतात. शुक्रवारी (दि. ३१ मे) रात्री साडे अकराच्या सुमारास परगावी गेल्या होत्या. शनिवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास त्या घरी आल्या असता घराचे कुलुप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरात चोरी झाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले.

या घटनेची माहिती शिरपुर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच श्वास पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र श्वान पथक महादेव मंदिराजवळ घुटमळले. चोरट्यांनी शिंदे यांच्या घरातील ३ लाख ७९ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरून नेले. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवन करत आहे