थेऊर : वार्ड रचना व आरक्षण संदर्भातील विशेष ग्रामसभा, जाणून घ्या वार्ड निहाय आरक्षण

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) – चालू वर्षी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची वार्ड रचना व आरक्षण संदर्भातील विशेष ग्रामसभा थेऊर येथील ग्रामपंचायत सभागृहात पार पडली. थोडीशी नरम गरम स्वरुपातील या सभेसाठी निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून राजकुमार लांडगे तसेच मंडल अधिकारी गौरी तेलंग शेळके, गाव कामगार तलाठी योगिराज कनिचे, मिलिंद सेठी, थेऊर चे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे, उपसरपंच विलास कुंजीर, महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, काळुराम कांबळे, माजी सरपंच नवनाथ काकडे, ग्रामपंचायत सदस्य शहाजी जाधव, नितीन कुंजीर, राहुल कांबळे,काशिनाथ कोळेकर, गजानन आगलावे, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष सुदाम गावडे, योगेश काकडे, यशवंत बोराळे, मारोती कांबळे, विलास कुंजीर, यशवंत कुंजीर,गोविंद तारु, रोहिदास चव्हाण आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूर्व हवेलीतील बहुतांश ग्रामपंचायतीचा कार्यकाल जुन महिन्यात संपत असल्याने या गावात निवडणूक प्रक्रियेसंदर्भात गावची आरक्षण व वार्ड रचनेचे काम चालू आहे. थेऊर येथील वार्ड रचना व आरक्षण संदर्भातील विशेष ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केली होती. यावेळी शासनाच्या निकषानुसार आरक्षण संदर्भातील चर्चा झाली. सन 2011 च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या विचारात घेऊन वार्ड रचना व आरक्षण असल्याचे अध्यासी अधिकारी यांनी सांगितले. यानुसार गावची एकुण लोकसंख्या 9671 इतकी असून अनुसूचित जातीचे एकुण 1754 मतदार असल्याने तीन सदस्य त्यापैकी दोन महिला व एक पुरुष अनुसूचित जमातीचे 453 मतदार असल्याने एक महिला सदस्य तर सर्व लोकसंख्येच्या 27 टक्के आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने पाच सदस्य यातील तीन महिला व दोन पुरुष असे आरक्षण निघाले आहे.

त्यानुसार गावची वार्ड निहाय आरक्षण पुढील प्रमाणे –

वार्ड एक (एकुण मतदार – 1810)
1)सर्वसाधारण प्रवर्गासाठी
2)नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
3)नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष

वार्ड दोन (एकुण मतदार- 1825)
1)सर्वसाधारण प्रवर्गासाठी
2)सर्वसाधारण प्रवर्ग महिला
3)नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

वार्ड तीन (एकुण मतदार -1026)
1)सर्वसाधारण प्रवर्गासाठी
2)अनुसूचित जमाती महिला

वार्ड चार (एकुण मतदार – 1828)
1)सर्वसाधारण प्रवर्गासाठी
2)अनुसूचित जाती महिला
3)अनुसूचित जाती पुरुष

वार्ड पाच (एकुण मतदार -1639)
1)नागरिकांचा मागास प्रवर्ग
2)अनुसूचित जाती महिला
3)सर्वसाधारण प्रवर्ग महिला

वार्ड सहा ( एकुण मतदार -1546)
1)सर्वसाधारण प्रवर्गासाठी
2)सर्वसाधारण प्रवर्ग महिला
3)नागरिकांचा मागास प्रवर्ग