‘टिक टॉक’वर व्हिडीओ बनवणं जीवावर बेतलं ; एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था : टिकटॉक च्या व्हिडीओजने सोशल माडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. भारतात काही ठिकाणी या अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लिल मजकूर अपलोड होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ या अ‍ॅपवर बंदी आणण्यासाठी मद्रास हायकोर्टाकडून याचीका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मद्रास हायकोर्टाने अ‍ॅपवर बंदी घातली. टिकटॉक हे फक्त प्ले स्टोर वरून हटवले मात्र ज्यांच्याकडे पहिल्यापासूनच टिकटॉक अँप डाउनलोड आहेत ते तरुण अजूनही वापर करताहेत. टिक टॉकवर व्हिडीओ बनवत आपला जीव धोक्यात घालत आहेत.

त्याचेच एक उदहारण म्हणजे गोव्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. मोबाइलवर ‘टिक टॉक’वर स्टंट करीत असताना मानेची धमनी (शीर) तुटल्याने मूळ केरी-साळजिणी येथील युवकाचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. अर्धफोंड येथील बलराम उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावी वाणिज्य शाखेत शिकणारा सूरज रमेश गावकर (१७) सोमवारी सायंकाळी दाबेल-पैंगीण येथील आपल्या आत्याच्या घरी मोबाइलवर ‘टिक टॉक’ अ‍ॅपवर स्टंट शूट करीत होता. ह्या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसानी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मंगळवारी सायंकाळी त्याच्यावर केरी येथे अंतिम संस्कार करण्यात आले. मनमिळावू स्वभावाचा असलेला सूरज हुशार विद्यार्थी होता, असे या विद्यालयाचे प्राचार्य कमलाकर म्हाळशी यांनी सांगितले. सूरजच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवर त्याच्या निवासस्थानी उपस्थित होते. त्याच्या पश्चात आई, वडील व बहिणी असा परिवार आहे.

२४ एप्रिल पर्यंत टिकटॉक अ‍ॅपवर विचार करून निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्ययालयाला मुदत दिली आहे. २४ एप्रिल पर्यंत अंतिम निर्णय देण्यात नाही आला तर त्यावर लावण्यात आलेली बंदी काढून टाकण्यात येईल. असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. भारतात सध्या ९ कोटी लोक टिक टॉक अ‍ॅप वापरतात, असा अंदाज आहे. पण हे टिक टॉक तरुणानांचा जिव घेणारं ठरत आहे.