पोलिसांनी छापा टाकल्याने बदनामीच्या भीतीने चौघांच्या नाल्यात उड्या ; दोघांचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – स्थळ पांढुर्णा गावाजवळील ओढ्याकाठचा परिसर, ते सर्व जण जुगार खेळत असतात. अचानक पाच ते सात जण त्यांच्या दिशेने धावत येताना दिसतात. ते पोलीस असावेत, असे वाटून त्यांच्यात एकच धावपळ उडते. पोलिसांपासून वाचण्याच्या नादात त्यांच्यातील चार जण चक्क शेजारच्या नाल्यात उड्या मारतात.  मात्र, पोहता येत नसल्याने त्यांच्यापैकी दोघांचा मृत्यू होतो. पोलिसांच्या तावडीतून सुटण्याच्या नादात त्यांच्या आयुष्याचाच जुगार झाला.

शेख जावेद इकबाल (वय २२, रा, हसनबाग) आणि इरफान जिब्राईल शेख (वय ३०) अशी मृतांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी, जावेद, इरफान आणि त्यांचे पाच ते सात मित्र शुक्रवारी दुपारी पांढुर्णा गावाजवळ जुगार खेळत बसले होते. तेव्हा अचानक काही जण धावत त्यांच्या दिशेने येताना त्यांनी पाहिले. ते पोलीस असावेत, असे वाटून जुगार खेळणारे पळून जाण्यासाठी वाट मिळेल तिकडे ते पळू लागले. जावेद, इरफान व आणखी दोघांनी शेजारच्या नाल्यात उड्या मारल्या. त्यात किती पाणी आहे याचा अंदाज नसल्याने आणि पोहता येत नसल्याने जावेद आणि इरफान यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती सक्करदरा पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह शनिवारी बाहेर काढले.

या जुगारींच्या दिशेने कोण धावत येत होते, याविषयी गावात उलटसुलट चर्चा सुरु आहे. ते बोगस पोलीस असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Loading...
You might also like