रामानंतर उद्धव ठाकरेंचे विठ्ठलाकडे साकडे; चंद्रभागेच्या तिरी करणार आरती!

मुंबई -पोलिसनामा ऑनलाईन- अयोध्येनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख पंढरपुरात जाऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येतील शरयूप्रमाणेच पंढरपुरातील चंद्रभागेच्या तिरावर आता आरती करणार आहेत. 24 डिसेंबरला पंढरपूरमध्ये शक्तीप्रदर्शन केले जाईल. शरयूनदीवरील आरतीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चंद्रभागेच्या तीरावर आरती करणार आहेत. आणि  विठ्ठल मंदिराचे दर्शन घेऊन अयोध्येत राम मंदिर बांधण्याची त्याचबरोबर दुष्काळाबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याची सुबुद्धी सरकारला द्या,असे साकडे घालणार असल्याची माहिती समोर आली आहे.
संघटना आणि पक्ष म्हणून आपण दुष्काळग्रस्तांना मदत करतच आहोत. तरीही दुष्काळप्रश्नी आपण सरकारला जागे केले पाहिजे, असे शनिवारी शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितले. दुष्काळ प्रश्नाविषयी सरकारला जागे करण्यासाठी ते 24 डिसेंवर रोजी सभा घेतील. त्याचबरोबर येथूनच निवडणुकांचे रणशिंग फुकणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.या सभेसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह राज्यभरातील वारकरी देखील हजर राहतील.
शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना मंत्री आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली.सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या या बैठकीला शिवसेना नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे हे देखील उपस्थित होते.