सध्या वैभव बरा आहे, आराम करतोय : ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचे निर्माते राहुल भंडारे

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता वैभव मांगलेला नाटकाच्या प्रयोगादरम्यान चक्कर आली होती. सध्या त्याला सांगलीमधील क्रांती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अलबत्या गलबत्या या नाटकाच्या प्रयोगादरम्यान ही घटना घडली आहे.

दरम्यान नाटकाचे निर्माता राहुल भंडारे यांनी वैभव मांगले याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. नाटकाचा पाच मिनीटे प्रयोग शिल्लक राहिला असताना अति उकाड्यामुळे वैभवला चक्कर आली. त्याच्यावर अवघ्या पाच मिनीटात योग्य उपचार मिळाल्याने त्याने प्रयोग पूर्ण केला. वैभव सध्या बरा असून तो आराम करत आहे.

सांगलीमध्ये ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा प्रयोग सुरु होता. नाटकाचे शेवटचे पाच मिनीटे राहिले असताना वैभव अचानक खाली कोसळला. त्यामुळे नाटकाचा प्रयोग थांबवावा लागला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर सहकाऱ्यांनी त्याला उचलून स्टेजवरून बाहेर नेले. याठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. तपासणी दरम्यान अती उकाड्यामुळे त्याला चक्कर आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. थोडा आराम करून आणि उपचार घेऊन वैभवने नाटक पूर्ण केले.