अखेर वंचित बहुजन आघाडीत ‘बिघाडी’, ओवेसींकडून ‘शिक्कामोर्तब’ !

हैदराबाद : वृत्तसंस्था – वंचित बहुजन आघाडीत अखेर बिघाडी झाली असून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून बिघाडीवर शिक्कामोर्तब केले आहे. आघाडीबाबत इम्तियाज जलील यांनी केलेलं वक्तव्य ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे ओवेसींनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएम वेगवेगळे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभेच्या तोंडावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितसोबत असलेली युती तोडल्याची घोषणा नुकतीच केली. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये इम्तियाज जलील यांनी वंचितमधील आरएसएस मंडळींना एमआयएमसोबत युती नको असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. युती तोडण्यामध्ये आरएसएसच्या मंडळींचा हात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता.

वंचितकडे एमआयएमने 74 जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातील आठ जागा आम्हाला देण्यात आले आहेत. प्रकाश आंबेडकर यांना एमआयएम पक्षाकेडे वोट बँक नसल्याचे दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्याकडे किती वोट बँक आहे दिसून येईल, असे इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

दरम्यान, वंचित बुहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आमची युती ओवेसींसोबत झाली आहे. महाराष्ट्रातल्या नेत्यांशी झाली नाही. ओवेसी याविषयी जोपर्यंत काही स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत आमची युती कायम असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता ओवेसींनी आघाडीबाबत स्पष्ट केल्याने वंचित आणि एमआयएम वेगवेगळे लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –