राष्ट्रवादीला धक्का ; मोहिते-पाटील पिता-पुत्र भाजपच्या वाटेवर ?

आज दुपारी घोषणा होण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतरही तेथील उमेदवार जाहीर करण्यास वेळ लावला जात असल्याने विजयसिंह मोहिते अस्वस्थ असून त्यातून आपले तिकीट कापण्यासाठी हा उशीर केला जात असल्याचे त्यांचे मत बनल्याचे समजते. त्यातूनच मोहिते पिता पुत्रांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

विजयसिंह मोहिते यांनी मंगळवारी दुपारी ३ वाजता अकलुज येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असून त्यात ही घोषणा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माढामधून प्रभाकर देशमुख यांचे नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळे नाराज विजयसिंह मोहिते पाटील हे अन्य पयार्याचा विचार करू शकतात का ? तसेच केवळ पक्षावर दबावासाठी सर्व सुरू आहे ? याकडे देखील सवार्चं लक्ष लागून राहिले आहे.

माढामधून विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत.  मोहिते-पाटील यांनी त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. पण, राष्ट्रवादीतील नेत्यांचा मात्र त्याला रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या नावाला विरोध असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान ४ खासदारांपैकी तिघांच्या उमेदवारीची घोषणा केली. परंतु, माढातील उमेदवार जाहीर न केल्याने विजयसिंह मोहिते हे दुखावले गेले. त्यातूनच आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी ते आता भाजपचा मार्ग पत्करु शकतात, असे सांगितले जात आहे.