अभिनेता विवेक ओबेरॉयवर गुन्हा दाखल करा : नवाब मलिक 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महिलांचा अपमान करणाऱ्या विवेक ओबेरॉयवर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. एक्झिट पोलचे अंदाज समोर आल्यानंतर त्यासंदर्भातले एक मीम अभिनेता विवेक ओबेरॉयने पोस्ट केले. या मीमध्ये ऐश्वर्या रॉयची खिल्ली उडवण्यात आली आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने विवेक ओबेरॉय विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉयने पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या अभिनेत्रीची खिल्ली उडवली आहे. तसंच महिलांबाबत व्यक्त होताना मर्यादा सोडली आहे. अशावेळी महिला आयोग झोपी गेला आहे का? असा प्रश्न ही  नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. सरकारने त्याच्यावर कारवाई केली नाही तर जनतेमधून उद्रेक होईल. त्यामुळे सरकारने तातडीने लक्ष घालावे अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

मीममध्ये काय आहे ?

एक्झिट पोल समोर आल्यापासून हे मीम व्हायरल होत आहे. हेच मीम विवेक ओबेरॉयने ट्विटरवर पोस्ट केले आहे. या मीममध्ये तीन फोटो आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो आहे. त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो आहे. त्या फोटोत एक्झिट पोल असे लिहिले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अराध्या यांचा फोटो आहे. त्याफोटोखाली रिझल्ट असं लिहिलं आहे. हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नाही. मात्र ते शेअर करत हे मीम आपल्याला खरोखरच आवडले अशी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यानंतर त्याला ट्रोल व्हावे लागले आहे. यावरूनच आता नवाब मलिक यांनी विवेक ओबेरॉयवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Loading...
You might also like