राष्ट्रीय आरोग्य अभियान : नेहा तिर्लोटकर यांना सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार

पोलीसनामा ऑनलाईन – सन २०१७-१८ या वर्षातील सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार देवगड तालुक्यात सर्वाधिक कामावर आधारित मोबदला प्राप्त केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नेहा तिर्लोटकर (प्रा. आ. केंद्र पडेल, उपकेंद्र तिर्लोट), तर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रज्ञा धोपटे (प्रा. आ. केंद्र- इळये, उपकेंद्र- जामसंडे) यांना जाहीर झाला असून पुरस्कार रक्कम अनुक्रमे ४ हजार व २ हजार ५०० इतकी आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका योजना सुरू असून आरोग्यविषयक कार्यक्रमांची माहिती समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत मिळवून देण्यासाठी आशा स्वयंसेविका प्रयत्न करत आहेत. या आशा स्वयंसेविकांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी तसेच जोमाने काम करण्याची प्रेरणा देण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार जिल्हास्तरावर देण्याबाबत उपक्रम सुरू आहे.

त्या अनुषंगाने सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकेस जिल्हास्तरावरून दोन पुरस्कार, तालुकास्तरावरून दोन पुरस्कार, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून एक पुरस्कार तसेच नावीन्यपूर्ण कामासाठी आरोग्य सखी पुरस्कार जिल्हास्तरावरून देण्याचे प्रस्तावित आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सर्वाधिक कामावर आधारित मोबदला प्राप्त करणााऱ्या आशा स्वयंसेविकांना २०१७-१८ या आर्थिक वर्षातील सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार जाहीर झाले असून, यात वैभवी मुळम (प्रा. आ. केंद्र पडेल, उपकेंद्र पुरळ), जयश्री अनुभवणे (प्रा. आ. केंद्र- मोंड, उपकेंद्र- पेंढरी), अंजली चव्हाण (प्रा. आ. केंद्र- फणसगाव, उपकेंद्र पोभुर्ले), किरण कोकम (प्रा. आ. केंद्र मिठबाव, उपकेंद्र कोटकामते), रेश्मा कदम (प्रा. आ. केंद्र- इळये) विषय दळवी (प्रा. आ. केंद्र- शिरगाव, उपकेंद्र-तळवडे) यांना प्राप्त झाले असून पुरस्कार रक्कम १ हजार एवढी आहे.