वडगाव रासाईतील गुन्हे राजकीय द्वेषातुन; भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्र येत आमदारांवर टीकेची झोड

पोलीसनामा ऑनलाइन – वडगाव रासाई येथील नवनिर्वाचीत सरपंचासह इतरावर दाखल झालेले गुन्हे राजकीय द्वेषातुन झाले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत केला आहे .त्यामुळे पुन्हा एकदा शिरुर तालुक्यात विद्यमान आमदारांच्या विरोधात सर्वजण एकवटल्याचे पाहायला मिळाले आहे.

शिरुर येथे भाजपच्या संपर्क कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात वडगावचे सरपंच शेलार व ग्रामपंचायत सदस्यांचा माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिपदादा कंद म्हणाले वडगाव रासाई हे माझे मूळ गाव आहे, आम्ही शेलार कुळातीलच आहोत. त्यामुळे माझ्या गावातील, माझ्या भावकीतील, माझा सहकारी सरपंच झाला असेल तर त्याच्या सत्कार सोहळ्याला मी जाणारच. पण त्यावरून एवढे खालच्या दर्जाचे राजकारण होईल, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतील, असे वाटले नव्हते.

वास्तविक आमदारांनी पराभव मान्य करून तरुणांना मोठ्या मनाने शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. परंतू त्यांच्या कृपेमुळे आनंदाच्या क्षणी तरुण कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात बसण्याची वेळ आली. गावातील पराभव त्यांना सहन झालेला दिसत नाही. सच्च्या कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होताना असले हजार गुन्हे दाखल झाले तरी डगमगणार नाही. कार्यकर्त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी यापुढेही वडगावात जातच राहणार. त्यामुळे गुन्हे दाखल होणार असतील तर त्याची पर्वा नाही, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीच्या काळात पोलीस किती दक्ष आहे हे संजय राठोड यांच्या प्रकरणावरून कळाले आहे. पोहरादेवीच्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले नाही, मग वडगाव रासाई गावातच गुन्हा दाखल का? असा सवाल माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी उपस्थित केला. विद्यमान लोकप्रतिनिधींनी प्रशासन आपल्या हातातले खेळणं बनवून विरोधकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांचे नातेवाईक कार्यकर्ते राजरोसपणे कायदा सुव्यवस्था बिघडत असून, याच्या विरोधात उद्रेक होण्याची शक्यता पाचर्णे यांनी व्यक्त केली. आपल्या गावात झालेला पराभव मोठ्या मनाने स्वीकारणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. केवळ राजकीय द्वेषापोटी असे गुन्हे दाखल करणे योग्य आहे का? असा सवाल पाचर्णे यांनी केला आहे.

राज्याच्या सत्तेत एकत्र असल्याचा कुठलाही विचार न करता आमदारांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांखाली जेलमध्ये बसविले, असा आरोप सुधीर फराटे यांनी केला.
यावेळी माजी आमदार बाबूराव पाचर्णे,मा.जि.प अध्यक्ष प्रदिपदादा कंद, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे, भाजपा नेते धर्मेंद्र खांडरे ,वडगाव रासाई चे सरपंच सचिन शेलार, काका खळदकर उपस्थीत होते.