पाणी पुरवठा करणार्‍या बहुतांश टँकरला गळती

पाण्याची नासाडी थांबवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शहरासह जिल्ह्यात भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळात जनतेला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्यावतीने टंचाईग्रस्त जनतेला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी पाणी पुरवठा करणार्‍या बहुतांश टँकरला गळती लागलेली आहे. त्यामुळे थेट जनतेपर्यंत केवळ ३० ते ४० टक्केच पाणी पोहच होत असून या गळक्या टँकरमधून पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे.

गळक्या टँकरमुळे पाण्याची होत असलेली नासाडी थांबवावी अशी मागणी करत फुले ब्रिगेडच्यावतीने बुधवारी (दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी ब्रिगेडच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

सध्या संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळून निघत आहे. शासन आणि प्रशासनाच्यावतीने विविध दुष्काळी उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. त्यातील एक उपाययोजना म्हणजे टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे अशी आहे. नगर शहरासह जिल्हाभरात प्रशासनाकडून टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र सदरची पाणी पुरवठा यंत्रणा अत्यंत कुचकामी ठरली आहे. पाणी पुरवठा करणार्‍या बहुतांश टँकरला गळती लागलेली आहे. त्यामुळे उद्भवापासून पाणी भरुन निघालेले टँकर रस्त्यावरुन जाताना गाव, वस्ती, गल्ली पर्यंत जाताना निम्म्याहून अधिक रिकामे होतात. निम्मे अधिक पाणी रस्त्यानेच गळत असल्याने पाण्यासाठी टँकरकडे डोळे लावून बसलेल्या जनतेपर्यंत केवळ ३० ते ४० टक्केच पाणी पोहोच होत असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. या गळक्या टँकरमुळे नागरिक आणि जनावरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

तरी पाण्याची होणारी नासाडी तातडीने थांबवावी, सर्व नादुरुस्त टँकरची दुरुस्ती करावी. दूध, पेट्रोल, डिझेलच्या टँकरप्रमाणे पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी फुले ब्रिगेडने केली आहे. या आंदोलनात शहराध्यक्ष दिपक खेडकर, ब्रिजेश ताठे, आशिष भगत, निखिल ताठे, हर्षल खेडकर, संकेत ताठे, अजय भगत, सनी दळवी, ऋषिकेश ताठे आदी सहभागी झाले होते.