अखेर स्वारगेट – हडपसर BRT गुंडाळला, नगरसेवक योगेश ससाणेंच्या प्रयत्नांना यश

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – शहरात प्रायोगिक तत्वावर कात्रज – हडपसर रस्त्यावर राबविण्यात आलेल्या बीआरटीपैकी स्वारगेट – हडपसर हा मार्ग अखेर गुंडाळण्यात आला आहे. ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ ठरलेला या बीआरटी मार्गामुळे सोयीपेक्षा अडचणच अधिक आणि वाहतूक कोंडी होत होती.

नगरसेवक योगेश ससाणे यांच्या प्रयत्नांमुळे अखेर महापालिकेने हा मार्ग काढून टाकण्याचा निर्णय घेतला. या बीआरटी मार्गासाठी बांधण्यात आलेली मार्गिका जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकली. यामुळे हडपसरमधील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर सुटका होईल, असा विश्वास नगरसेवक योगेश ससाणे यांनी व्यक्त केला.

brt-route

याबाबत ससाणे यांनी सांगितले की, गेली जवळपास पावणे दोन वर्षे पुणे महापालिका, वाहतूक शाखा यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करत होतो. अखेर या प्रयत्नाला यश आले आहे. कालपासून येथील बीम काढून टाकण्याचे काम सुरु झाले आहे. येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

बीआरटी मार्ग काढून टाकल्यानंतर रस्ता रुंदीकरण करणे, फुटपाथ कडेला घेणे, सर्व्हिस रोड काढून टाकणे, सायकल ट्रक व्यवस्थित करणे अशा गोष्टी केल्यानंतर पुणे सोलापूर रोडवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे, असे योगेश ससाणे यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेने २००६ मध्ये कात्रज ते हडपसर दरम्यान शेकडो कोटी रुपये खर्च करुन सुमारे १६.८ किलोमीटर बीआरटी मार्ग बांधण्यात आला होता. केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजने अंतर्गत मिळालेल्या निधीतून रस्त्यावर बीआरटी लेन बांधण्यात आली. यामुळे उर्वरित लेन इतर नियमित रहदारासाठी, सायकल ट्रॅक, फुटपाथ बांधण्यात आले. शहरामध्ये रस्त्यावर करण्यात येणारे सर्व नवीन प्रयोग हडपसरच्या रस्त्यावर करण्यात येत असल्याने या रस्त्यावर प्रचंड वाहतुक कोंडी होते. यामुळे हा बीआरटी मार्ग रद्द करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे आणि नागरिकांनी केली होती.

सुमारे १४ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या या बीआरटी प्रकल्पाचे काम अर्धवट करण्यात आले होते. त्यात बससाठी स्वतंत्र सिग्नल व्यवस्था, पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग अशी अनेक कामे करण्यात आली नाहीत. त्यामुळे हा रस्ता ओलांडणे, हे पादचाऱ्यांसाठी नेहमीच धोकादायक ठरत आले होते. तसेच त्यांची व्यवस्थित अंमलबजावणी करण्यात न आल्याने तो मार्ग रिकामा राहत होता. तर शेजारच्या रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी असे चित्र दिसत होते. त्यातूनच हा बीआरटी मार्ग काढून टाकण्याची मागणी पुढे आली होती.

Visit : Policenama.com