जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना टोलनाक्यावर धक्काबुक्की, अर्वाच्च शिवीगाळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना किणी येथील टोलनाक्यावर धक्का बुक्की करुन शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी किणी येथील टोलनाक्यावरील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून विजय शामराव शेवडे (रा. घुणकी) याला अटक करण्यात आली आहे. त्याचा सहकारी फरार झाला आहे. हा प्रकार सोमवारी रात्री ११ वाजता घडला होता.

याप्रकरणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल केशव कदम यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व इतर अधिकारी इस्लामपूरहून निवडणुकीचे काम पाहून कारने परत कोल्हापूरला येत होते. त्यांची कार रात्री ११ वाजता किणी टोलनाक्यावर आली. लेन क्रमांक सातवरुन जात असताना अधिकाऱ्यांनी शासकीय ओळखपत्र दाखवून सोडण्याची विनंती केली. मात्र, येथील कर्मचारी विजय शेवडे व त्यांचा सहकाऱ्याने राहुल कदम यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. तेव्हा अमन मित्तल हे गाडीतून खाली उतरले तेव्हा त्यांनाही धक्काबुक्की करीत शिवीगाळ करण्यात आली. तसेच निवडणुकीच्या कामाकाजासाठी असलेले वाहन अडवून ठेवले. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात येऊन विजय शेवडे याला अटक करण्यात आली आहे.