जिल्हा परिषद अतिक्रमणाबाबतचा ‘तो’ अहवाल संशयाच्या भोवऱ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांवर अतिक्रमण झाले आहे की नाही, याबाबत चौकशी करण्यात आली होती. चौकशीत फक्त पाच ठिकाणीच अतिक्रमण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे चौकशी अहवाल संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सादर केलेल्या अहवालात ५ ठिकाणीच अतिक्रमण झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे या अहवालावर काही सदस्यांनीच दोन दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत संशय व्यक्त केला होता. त्यामुळे अतिक्रमणांचा हा अहवाल आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रशासनाने यावर अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.

नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या एकूण १ हजार ७९ जागा आहेत. यापैकी ५ जागांवर अतिक्रमण झाले असून सदर अतिक्रमण काढण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचा अहवाल ग्रामपंचायत विभागाने सर्वसाधारण सभेत दिला होता. त्यानंतर मात्र सदस्यांनी या अहवालावर शंका उपस्थित केल्या. एका गावातच चार ते पाच ठिकाणी अतिक्रमण झाले असताना संपूर्ण जिल्ह्यात पाच ठिकाणीच अतिक्रमण झाल्याचे सांगितले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सदस्य अनेकदा अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित करत असतात. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अनेक जागांवर अतिक्रमण होत आहे.

चुकीची व दिशाभूल करणारी माहिती

अधिकाऱ्यांकडून चुकीची तसेच दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा आरोप तर सदस्य सातत्याने करीत असतात. आताही प्रशासनाने दिलेल्या अहवालात मात्र पाच जागांवर अतिक्रमण असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या अतिक्रमणांबाबत आता संशय निर्माण झाला आहे.