मतीन सय्यद टोळीतील सराईत गुन्हेगार गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील मध्यवस्तीमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या मतीन सय्यद या टोळीला पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या टोळीतील सहा जणांना तडिपार करण्यात आले आहे. तडिपारीचा आदेश असतानाही पुणे शहरात वावरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने सापळा रचून अटक केली.

मतीन सय्यद टोळीवर मध्यवस्तीत राहणाऱ्या नागरिकांना, व्यापारी, दुकानदार, गाळेधारक यांना शस्त्राचा धाक दाखवून दशहत निर्माण केल्याचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील मतीन अब्दुल सय्यद (वय-२२ रा. गणेश पेठ), राहिल अब्दुल सय्यद (वय-२२), दानिअल अन्वर शेख (वय-२१) शहेजाद कमरुद्दीन शेख (वय-२१), अफाक अन्सार खान (वय-२०), मेहराज सय्यद शेख (वय-२२) यांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडिपार करण्यात आले होते.

तडिपार राहिल अब्दुल सय्यद हा गणेशपेठ येथे आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस हवालदार शकील शेख यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गणेश पेठ येथे सापळा रचून राहिल सय्यद याला अटक केली. त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे, बेकायदेशीर जमाव जमवून दहशत पसरवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर दाखल आहेत. गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने राहिल याला अटक करुन फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई प्रभारी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजेंद्र मोकाशी, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे, पोलीस कर्मचारी दिपक मते, शकील शेख, संतोष क्षीरसागर, मच्छिंद्र वाळके, राहुल घाडगे, नितीन रावळ, कैलास साळुंके, गजानन गाणबोटे यांच्या पथकाने केली.