Coronavirus : ‘कोरोना’मुळं बिहारमध्ये ‘अलर्ट’ जारी, पटणा विमानतळावर मेडिकल टीम तैनात

पटणा : वृत्त संस्था – चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या आजाराबाबत बिहारमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. यूपीच्या नोएडामध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणाची खात्री झाल्यानंतर हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात आरोग्य अधिकार्‍यांची तातडीची आपत्कालीन बैठक झाली. बिहार सरकारने नेपाळ बॉर्डरवर विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. नेपाळमधून बिहारमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गात आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले असून संशयित रूग्णांची तपासणी केली जात आहे.

याशिवाय खबरदारी म्हणून पटणा एयरपोर्टवर सुद्धा डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांची प्राथमिक तपासणी करून नमूणे पीएमसीएचकडे पाठवण्यात येणार आहेत.

कोरोनाबाबत अ‍ॅडव्हायजरी जारी

तर राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाबाबत अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. नेपाळने कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. नेपाळ सरकारने कोरोना प्रभावित चीनसह पाच देशांच्या नागरिकांना अस्थायी वीजा देण्यास बंदी आणली आहे.

अफवांकडे लक्ष देऊ नका

बिहारच्या आरोग्य विभागाने राज्यात कोरोना व्हायरसचा एकसुद्धा रूग्ण सापडला नसल्याचे म्हटले आहे. आरोग्य विभागाने अ‍ॅडव्हायजरी लागू करताना लोकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेऊ नका. शिंकताना, खोकताना नाकावर आणि तोंडावर रूमाल ठेवा. याशिवाय आरोग्य विभागाने कोरोनाची लक्षणे आढळल्यास ताबडतोब 104 नंबरवर कॉल करा, किंवा जवळच्या सरकारी दवाखान्यात जाण्याचे निर्देश दिले आहेत.