पोलीसांनी CCTV च्या सहाय्याने अवघ्या २ तासात दागिन्याची बॅग दिली शोधून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवार दिनांक 29 मे 2019 रोजी महिला तक्रारदार अलका संभाजी जरांडे (वय 32, राहणार. सोनारपाडा गाव देवी सोसायटी, कल्याण शिव रोड, सोनारपाडा, ठाणे) या त्यांच्या माहेरी(गाव भिवंडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) येथे जाण्याकरिता त्यांचा मुलगा मयूर जरांडे यांच्यासह पुणे रेल्वे स्टेशन येथून रिक्षाने निघून शितल पेट्रोल पंप कोंढवा येथे सायंकाळी 5.00 वाजण्याच्या सुमारास उतरल्या होत्या. त्यानंतर थोड्यावेळाने त्यांच्या लक्षात आले की त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरली आहे. त्या बॅगे मध्ये 20 हजार रुपये रोख रक्कम, एक तोळे सोन्याची चैन, एक सोन्याची अंगठी, एक सोन्याचे नथ असा ऐवज होता. तक्रारदार महिलेला बॅग मिळत नसल्याने हरवलेल्या बॅगेची तक्रार देण्यासाठी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या.

कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये नमूद तक्रारदार महिलांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष शिंदे व पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे यांनी तक्रारदार महिला रिक्षातून ज्याठिकाणी कोंढवा येथे उतरल्या त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता. तक्रारदार महिला रीक्षा क्रमांक MH 12 CH 0213 या रिक्षाने कोंढवा येथे आल्याचे व सदर रिक्षामध्ये त्यांची बॅग विसरल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर सदर रिक्षाचे मालकाचा शोध घेऊन रिक्षाचालक नदीम युसुफ अन्सारी(राहणार.येवलेवाडी, कोंढवा, पुणे) त्यांच्या पर्यंत पोहोचून रिक्षा चालकाकडे तक्रारदार महिलेची रिक्षामध्ये विसरलेली बॅग व त्यामध्ये 20 हजार रूपये रोख रक्कम, एक तोळे वजनाची सोन्याची चैन, एक सोन्याची अंगठी, एक सोन्याची नथ असा मुद्देमाल तक्रारदार महिलेला अवघ्या दोन तासांमध्ये सुरक्षित परत मिळवून दिली.

तक्रारदार महिलेची बॅग ज्या रिक्षांमध्ये विसरली होती त्या रिक्षाचा शोध घेणे पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साह्याने तात्काळ शोधणे शक्य झाले. तरी पूर्ण पोलिसांतर्फे नागरिकांना सांगण्यात येते की आपण आपले सोसायटी, दुकाने, कार्यालये व इतर व्यावसायिक ठिकाणी, सार्वजनिक रस्ते, चौक दृष्टीक्षेपात येथील अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे अथवा घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना मदत होईल. असे आवाहन कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी नागरिकांना केले.

सदरची कामगिरी, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे यांनी केली.