लोकसभा निवडणूक २०१९ : म्हणून ६ वा टप्पा ‘भाजप’ आणि ‘महागठबंधन’साठी महत्वाचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी संपला असून दिल्लीतील ७ जागांसह ५९ मतदारसंघात रविवारी मतदान होणार आहे. या ५९ मतदारसंघापैकी उत्तर प्रदेशातील १४ मतदार संघातील मतदान हे भाजप आणि सपा व बसपा या महागठबंधनासाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहे.

उत्तर प्रदेशातील १४, हरियाणातील सर्व १०, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील सर्व ७, व झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होणार आहे. २०१४ मध्ये या ५९ मतदारसंघापैकी भाजपने ४४ जागा जिंकल्या होत्या.
उत्तर प्रदेशात रविवारी मतदान होणाऱ्या सर्व १४ जागा २०१४ मध्ये भाजपने जिंकल्या होत्या. या १४ जागांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व जागा जरी भाजपने जिंकल्या असल्या तरी नरेंद्र मोदी यांची लाट असताना समाजवादी पक्ष आणि बसपा या दोन पक्षांनी मिळविलेली मते ही भाजप उमेदवारापेक्षा किती तरी अधिक होती. अनेक ठिकाणी तर या दोन पक्षाच्या उमेदवारांची एकत्रित मते ही विजयी भाजप उमेदवारापेक्षा लाखांने अधिक होती. मात्र, तिहेरी लढतीत भाजप उमेदवार निवडून आला होता.

या निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन त्यानंतर अखिलेश यादव व मायावती हे दोघेही एकत्र आले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील पोट निवडणुकांमध्ये या महागठबंधन आघाडीने अनेक जागा मिळविल्या आहेत. या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बसपा यांनी आघाडी केली आहे. मोदी लाट असताना जर या दोन पक्षांना इतकी मते मिळाली असेल तर आता लाट नसताना व दोन्ही पक्षाची आघाडी केली असल्याने या मतदारसंघात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या १४ मतदारसंघातच भाजपला उत्तर प्रदेशातील सर्वाधिक जागा गमाविण्याची भिती वाटत आहे. तर हे सर्व १४ मतदारसंघ जिंकण्यासाठी महागठबंधनने जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यामुळे रविवारी होणाऱ्या मतदानात मतदार नेमके कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार हे या तीन पक्षांसाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहे.