पुरंदरमध्ये कांचन कुल व सुप्रिया सुळेंच्या मताधिक्यासाठी प्रयत्न

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – आत्तापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार कुटुंबियांच्या विरोधात युतीकडून केवळ औपचारिकता म्हणून उमेदवार उभा केला जात असे. यामुळे पुरंदर मध्ये राष्ट्रवादी काहीअंशी, तर तालुक्यातील इतर पक्ष निवडणूक गांभीर्याने घेत नसत. मात्र, यावेळी युतीकडून भाजपच्या कमळ चिन्हावर मतदार संघातील दौंड तालुक्यातील कांचन कुल यांच्या रूपाने मातब्बर उमेदवार दिल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.

पुरंदर तालुक्यात या निवडणुकीकडे काँग्रेस व शिवसेनेकडून विधानसभेची पूर्वपरीक्षा म्हणून पाहिले जात आहे. आघाडीच्या उमेदवार सुपिया सुळे यांना तालुक्यातून आत्तापर्यंतचे विक्रमी मताधिक्य देण्यासाठी तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी आपली पूर्ण ताकद त्यांच्यामागे उभी केली आहे. तर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी युतीच्या उमेदवार कांचन कुल त्यांच्या मताधिक्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात तालुक्यात फक्त राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्तेच सक्रिय होते. तालुक्यातील काँग्रेस पक्ष व नेते संजय जगताप हे तर त्यांच्या प्रचारापासून दूर होते. त्यावेळी तालुक्यातील शिवसेना नेते व आमदार विजय शिवतारे त्यावेळचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारात सहभागी होते. मात्र, ग्राऊंड लेवलवर जाऊन प्रचार करताना दिसत नव्हते. मात्र, या वेळी तालुक्यातील चित्र वेगळे आहे.

राष्ट्रवादीच्या एक पाऊल पुढे जाऊन काँग्रेस सुळे यांच्या प्रचारासाठी झटत आहे. संजय जगताप हे रात्रीच्या वेळी तालुक्यातील गावोगावच्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर बैठका घेत आहेत. जगताप यांनी आपली सर्व यंत्रणा सुळे यांच्यासाठी कामाला लावली आहे. चाळीस हजारांहुन अधिक मताधिक्य सुळे यांना देण्याचा विश्वास ते बोलून दाखवत आहेत. तशीच परिस्थिती शिवसेनेच्या गोटात दिसून येत आहे, राज्यमंत्री विजय शिवतारे हे मागील निवडणुकीपेक्षा अधिक आक्रमकपणे आपल्या विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणेच युतीच्या उमेदवार कांचन कुल यांना अधिकाअधिक मताधिक्यसाठी प्रयत्न करताना दिसत असून, काही करून सुळे या युतीच्या उमेदवाराच्या मागे राहण्यासाठी ते प्रयत्न शील आहेत. कांचन कुल निवडून येऊन इतिहास घडेल असे ते विश्वासाने सांगत आहेत.

Loading...
You might also like