Coronavirus : स्पेनमध्ये तब्बल 120 वर्षांनी ‘आणीबाणी’ जाहीर

माद्रिद : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरातील 115 पेक्षा अधिक देशांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. स्पेनमध्ये कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता पुढील 15 दिवसांसाठी आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी यांनी घोषणा केली. आणीबाणी जाहीर झाल्यानंतर, सरकारला कोरोनाचा जोरदारपणे सामना करण्यासाठी कठोर पावले उचलता येणार आहेत.

कोरोनामुळे जगभरातील अनेक देशांमधील नागरिकांना संसर्ग झाला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक देशाकडून कठोर पावलं उचचली जात आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. स्पेन सरकारलाही कोणताही विलंब न करता बरीच कठोर पावले उचलता येऊ शकतात. या परिस्थितीत, खासगी घरे वगळता तात्पुरते उद्योगधंदे, कारखाने किंवा इतर कोणत्याही परिसराचा ताबा घेऊन अनेक व्यापक उपाययोजना आखू शकते.

स्पेनचे पंतप्रधान सांचेझ यांनी सांगितले की, स्पॅनिश सरकार आपल्या सर्व नागरिकांचे संरक्षण करेल आणि महासाथीचे रोग कमी करण्यासाठीची हमी देईल. मात्र, त्यांनी सरकार नेमक्या कोणत्या उपाययोजना करणार आहे हे सांगितलेले नाही. सध्या स्पेनमध्ये शाळा, चित्रपटगृह बंद ठेवण्यात आली असल्याने जनजीन विस्कळीत झाले आहे. करोनामुळे युरोपीय महासंघातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या स्पेनच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत वाईट परिणाम झाले आहेत.