लासलगांव : नैताळे यात्रोत्सव माहिती

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – निफाड तालुक्यातील नैताळे येथील आराध्य दैवत श्री मतोबा महाराज यात्राेत्सवाला 10 जानेवारी पासून सुरुवात होत असून २४ जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे. नवनाथ ग्रंथामध्ये अडबंगनाथांची कथा आहे. त्यांचे जन्म स्थान  म्हणजे चास-देवगाव मार्गे शिर्डीला जाताना ‘धामोरी’ हे ठिकाण लागते. तर या अडबंगनाथांना घेउन जाण्यासाठी (इ. स. १२०० च्या आसपास) श्री मच्छिंद्रनाथ आणि इतर सारेच नाथ येऊन गेल्याचा उल्लेख आहे हा नवनाथ ग्रंथामध्ये आहे.

नवनाथ तेथुन जात असताना त्यांची तपश्चर्या करणा-या मतोबा महाराजांशी भेट झाली. ज्या ठिकाणी भेट झाली त्याच ठिकाणी त्या तपश्चर्या करणा-या श्री मतोबा महाराजांनी आपल्या सामर्थ्याने नऊ कुंडांची निर्मिती करून त्यांचे चरणकमल त्या पवित्र कुंडातील पाण्याने धुतले. नवनाथांचा आशीर्वाद घेतला. नवनाथांनी त्यांची अपार भक्ती आणि श्रद्धा पाहून त्यांना ‘साबरी विद्देचे’ कवित्व दिले.

पुढे कालांतराने नऊ तळ्याच्या समूहाच्या नावावरून या क्षेत्राला नऊ तळे (नैताळे) म्हटले जाऊ लागले .

आगमन आणि वास्तव्य :

श्री मतोबा हे सातपुडा पर्वत (सध्याचा सापुतारा) ओलांडून या ‘नैताळे’ या गावी वास्तव्यास आले, त्यांनी या गावचे पाटील पदाजी बोरगुडे यांच्याकडे गुराख्याची चाकरी धरली. श्री मतोबा महाराजांची मुक्या प्राण्यावर फार माया होती. गाई, गुरे चारत-चारत ते विंचू सुध्दा आपल्या अंगा खांद्यावरून खेळवू लागले. त्यांचा हा रोजचा खेळ पाहून त्याची चर्चा गावात व आसपासच्या खेड्यातही होऊ लागली. कुतूहलाने त्यांना पाहण्यासाठी लोक लांबून लांबून येऊ लागले.

त्यांच्या हाताच्या स्पर्शाने विष उतरू लागले, त्यांनी विषारी सर्प दंश झालेले लोक बरे केले. त्यांनी दिलेल्या विभूतीने असह्य रोग बरे होऊ लागले. त्यांच्या कार्याची महिमा वाढत जाऊन पुढे बराच काळ निघून गेल्यावर त्यांनी याच गोठ्यात जिवंत समाधी घेण्याचा प्रस्ताव पदाजी पाटलांकडे मांडला. तेव्हा सर्वांचे अश्रू अनावर झाले पण महाराजांनी सांगितले कि “जन्माला आलेला व्यक्ती कधीतरी या जगाचा निरोप घेणारच! मृत्यूच या जगातील प्रखर सत्य आहे. तेव्हा आपण दुःख मानण्याचे काहीच कारण नाही. माझा कार्यकाळ संपलेला आहे. आता हा वारसा गावक-यांनी जपायचा आहे !” असे त्यांनी सांगितले.

त्यांनी पौष पौर्णिमेचा दिवस निवडला आणि याच दिवशी शेष नागाला साक्षी ठेऊन जिवंत समाधी घेतली. पुढे याच जागी त्यांचे मंदिर बनवले गेले, तेव्हापासून तर आज पर्यंत दरवर्षी पौष पौर्णिमेला त्यांचे पुण्य स्मरण म्हणून यात्रोस्तव भरतो, तो १५ दिवस चालतो.

महाराजांच्या प्रतिमेची पहाटे विधिवत पूजा केल्यानंतर प्रतिमेच्या मिरवणुकीसाठी बैल गाडीचा रथ सजवला जातो. खानदेशातून सुध्दा भाविक आपली बैलजोडी बाबांच्या रथाला जुंपण्यासाठी आणतात,  हे दृश्य पहाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. रथापुढे जिल्ह्यातील नामवंत बॅण्डची पथके हजेरी लावतात. यात्रेत विविध प्रकारची खेळण्यांची, खाद्यपदार्थांची, भांड्यांची, अवजारांची दुकान असतात, रहाट पाळणे असतात. हा यात्रोत्सव येत्या शुक्रवार पासून सुरू होत असून आपणही नक्कीच एकदा जाऊन दर्शन घेऊन नतमस्तक व्हावे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/