नाशिकरोड रेल्वेस्थानकात कुत्र्याचे ५०० किलो मांस पकडल्याचे ‘ते’ वृत्त खोटे

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिकरोड रेल्वेस्थानकात कुत्र्याचे पाचशे किलो मांस जप्त केले, अशा आशयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. प्रत्यक्षात हा प्रकार अफवा असल्याचे स्पष्ट झाले. ही अफवा पसरविणाऱ्याचा कसून शोध घेतला जात आहे. कोणीतरी खोडसाळपणा करत रेल्वेच्या पार्सल डब्यात कुत्र्याचे पाचशे किलो मांस नाशिकरोड रेल्वेस्थानकावर जप्त केल्याची खोटी माहिती पसरवली होती.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे. कोणतीही शहानिशा न करता या अफवा वेगाने पसरविल्या जात असल्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. दिवाळीत अज्ञात लोकांनी नाशिकरोड परिसरात फटाक्यांच्या दुकानाला आग लागल्याचा फेक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर पुन्हा असाच खोडसाळपणा करत विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर नाशिकरोड रेल्वे स्थानकावर कुत्र्याचे पाचशे किलो मांस रेल्वे सुरक्षा बलाने जप्त केल्याचा खोटा मेसेज टाकला होता. ही माहिती खरी आहे की काय, हे जाणून घेण्यासाठी अनेकांनी नाशिकरोड रेल्वे महामार्गपोलीस, रेल्वे सुरक्षा बल, तसेच रेल्वे प्रशासनाकडे विचारणा सुरू केली.

काहीजणांनी तर रेल्वेस्थानकही गाठले. परिसरातील हॉटेलचालकांनी नाहक बदनामी झाल्यामुळे याप्रकरणी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली. दरम्यान, हेच छायाचित्र सोशल मीडियावर टाकत कुर्ला-देवणार रेल्वे स्थानकावर जप्त केल्याचा मेसेज टाकण्यात आला.