जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना ‘सल्ला’, म्हणाले – ‘साठीवरील लोकांना कोरोनाचा धोका, जास्त बाहेर फिरू नका’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्यती उपाययोजना केली जात आहेत. कोरोनाचा धोका 60 वर्षावरील व्यक्तींना अधिक असल्याचे आतापर्यंतच्या प्रकरणावरून दिसून येत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भाजप पूर्ण ताकदीने उतरला असून इतर पक्ष कुठे आहेत, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यांच्या या प्रश्नाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी थेट उत्तर देण्याऐवजी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा धोका साठीच्यावरील लोकांना अधिक उद्भवतो. त्यामुळे, आपण जास्त बाहेर फिरू नका. स्वत:ची काळजी घ्या. काही कमी जास्त लागलं तर कळवा. मी आहेच ना आपल्या मदतीला, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

तसेच विरोधी पक्षांना कोरोनाच्या संदर्भातील कामावर लक्ष देण्यास सांगितले. यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करत कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडी सरकारच्या घटक पक्षांचे योगदान काय, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचबरोबर कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा. त्यांना याची सगळ्यात जास्त गरज आहे.

भाजपचे हजारो कार्यकर्ते आज राज्यभर जीव तोडून मदतकार्य करत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 560 कम्युनिटी किचन्स चालवली जात आहेत. 43 लाख कुटुंबांना जेवण किंवा शिधा पुरवाल जात आहे. 6.50 लाखांपेक्षा जास्त मास्क आमि 4.75 लाख सॅनिटायझरचे वाटप केले आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

याला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत असतील तर आनंदच आहे. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय काम करत आहेत हे बघायचे असल्यास राष्ट्रवादीचे फेसबुक व ट्विटर हँन्डल वारंवार पाहण्याची सवय लावून घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन काय काम करत आहेत, हे आपल्याला दिसेल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.