ग्राम समितीला सहकार्य केल्यास गावे व जिल्हे कोरोनामुक्त होतील : प्राची जगताप

पुरंदर पोलीसनामा न्यूज ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर ग्राम समित्या स्थापन करण्यात येऊन गावागावात कोरोना आपत्ती व्यवस्थापन, ग्रामरक्षक किंवा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. गावागावात समित्या विविध निर्णय घेत आहेत. या ग्राम समितीला गावकऱ्यांनी सहकार्य केल्यास गावे व जिल्हे कोरोनामुक्त होतील असे निवेदिका व स्काईलार्क ऑटोमेशन संचालिका, प्राची जगताप यांनी सांगितले.

ग्राम पातळीवर आरोग्य सेवकांना सहकार्य करण्याबाबत ग्राम समितीने पाऊले उचलण्याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गावांची जबाबदारी या समित्यांवर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

केशकर्तनालये, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद ठेवावेत. केशकर्तन करणाऱ्या व्यक्तींना घरी बोलावून केस कापू नयेत. गावाच्या बाहेर जाताना समितीकडे नोंद करून जाण्याचा नियम लागू करावा. सार्वजनिक ठिकाणांवर जमा होण्याचे टाळावे. मास्क न लावता विक्री करणाऱ्या किराणा दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांवर समिती मार्फत कारवाई करावी. एकमेकांचे मोबाईल हातात घेणे टाळावे. समित्यांनी असे निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच या ग्राम समितीला गावकऱ्यांनी सहकार्य केल्यास गावे व जिल्हे कोरोनामुक्त होतील असे प्राची जगताप यांनी सांगितले.