अपघातग्रस्तास मदत करणार्‍या पत्रकाराला पोलिस अधिकार्‍याकडून दमबाजी

निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अपघातग्रस्तास मदत करणार्‍या पत्रकाराला पोलिस कर्मचारी आणि पोलिस अधिकार्‍याकडून दमबाजी झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दरम्यान, या घटनेचा पत्रकारांकडून तीव्र निषेध करण्यात आला असुन संबंधित पोलिस कर्मचारी आणि पोलिस अधिकार्‍यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. पोलिस सर्वसामान्यांवर अरेरावी करतात असे आपण वाचतो, ऐकतो मात्र चक्‍क पत्रकारावरच दमबाजी केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिस आयुक्‍त संबंधितांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य आणि वरिष्ठ पत्रकार लक्ष्मण मोरे हे बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी येथील सुहाम मंगल कार्यालयासमोरून जात होते. त्यावेळी एक तरूण त्यांना जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला दिसता. जखमी तरूणाचे बरेच रक्‍त वाहात होते. त्यामुळे पत्रकार मोरे हे तेथे थांबले. त्यांनी तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेबाबत माहिती दिली. बर्‍याच वेळानंतर देखील पोलिस घटनास्थळी पोहचले नसल्याने उपस्थितांच्या मदतीने पत्रकार मोरे यांनी जखमीला रूग्णालयात नेले. त्यानंतर देखील पोलिस पोहचले नसल्याने पुन्हा पत्रकार मोरे यांनी नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यानंतर थोडया वेळाने दोन पोलिस रूग्णालयात आले. त्यांनी जखमी तरूणाबाबत विचारपुस करणे अपेक्षित होते मात्र त्यांनी पहिला प्रश्‍न केला तो, पोलिस स्टेशनला कोणी फोन केला. पत्रकार मोरे हे पोलिसांचा प्रश्‍न ऐकुन अवाक झाले. त्यांनी पोलिस कर्मचार्‍यांना सविस्तर माहिती सांगुन आपण स्वतः पत्रकार असल्याने देखील सांगितले. मात्र, पोलिस कर्मचार्‍यांनी त्यांना अरेतुरेची भाषा चालु केली. पोलिस कर्मचार्‍यांनी बराच वाद घातला. त्यानंतर रूग्णालयाच्या बाहेर एक पोलिस जीप आलेली पत्रकार मोरे यांना दिसली.

जीपमधुन एक पोलिस अधिकारी आणि दोन पोलिस कर्मचारी उतरले. पत्रकार मोरे त्यांना भेटण्यास गेले असता जीपमधुन खाली उतरलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक आडके असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सहाय्यक निरीक्षक आकडे यांनी घटनेची चौकशी करणे अपेक्षित होते मात्र त्यांनी देखील पहिला प्रश्‍न केला तो, नियंत्रण कक्षाला फोन कोणी केला. आम्ही इथे असताना तु खोटी माहिती कशी देतो असे सहाय्यक निरीक्षक आडके हे पत्रकार मोरे यांना म्हणाले. दरम्यान, तु कोण पत्रकार आहेस रे, कुठल्या पेपरचा पत्रकार आहेस रे, बघतो मी पण, असले खूप पत्रकार पाहिले. अशी भाषा सहाय्यक निरीक्षक आकडे यांनी वापरली. त्यानंतर सर्वच पोलिस हे आक्रमक झाले आणि त्यांनी अरेरावी सुरू केली. त्यानंतर पत्रकार मोरे यांनी पोलिस आयुक्‍तांना फोन केला.

एखाद्या अपघातग्रस्तास मदत करणे गुन्हा आहे काय असाच प्रश्‍न आता सर्वसामान्यांना पडला आहे. सुशिक्षीत आणि सुसंस्कृत पुण्यात पोलिसांकडूनच पत्रकारांना दमबाजी होत असेल तर इतर सर्वसामान्यांना पोलिस कशी वागणुक देत असतील याबाबत विचार देखील करायला नको. घडलेल्या प्रकाराचा सर्व पत्रकारांनी निषेध केला असून संबंधित पोलिस कर्मचारी आणि पोलिस अधिकार्‍यावर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, पत्रकारावर दमबाजी करणार्‍या सहाय्यक पोलिस निरीक्षक आडके आणि इतर चार पोलिस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

Loading...
You might also like