अहमदनगर : ग्रामसेवकाकडून 94 लाखांचा अपहार

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन – अकोले तालुक्यातील शेणित व आंबेवंगण येथील ग्रामपंचायतीचे दप्तर (रजिस्टर) तत्कालीन ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव रणसिंग यांनी गहाळ करुन सुमारे ९४ लाख १७ हजार ६९२ रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजूर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

अकोले तालुक्यातील शेणीत व आंबेवंगण येथील ग्रामपंचायतीचा कार्यभार नोव्हेंबर २०१३ ते मे २०१८ या वर्षातील ग्रामपंचायतींचे पदभार ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव रणसिंग यांनी स्वीकारून गावच्या कारभाराला ग्रामपंचायतस्तरावर सुरुवात केली. परंतु शेणित व आंबेवंगन ग्रामपंचायत येथे कार्यरत असताना त्यांच्या ताब्यातील ग्रामनिधी व चौदावा वित्त आयोग, पेसा ग्रामसभा कोष निधी, पाणीपुरवठा निधी या खात्यावरील एकुण ९४ लाख१७ हजार ६९२ रूपये रक्कम व अंदाजपत्रके तांत्रिक मान्यता न घेता नियमबाह्य खर्च करून सदरचे दप्तर गव्हाळ करत मोठा अपहार केला आहे.

तर अपहार केल्याचे बँक स्टेटमेंट प्रमाणे दिसून येत आहे. तसेच त्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहाराची व दप्तर ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही. ग्रामपंचायत दप्तर स्वतःच्या ताब्यात स्वअधिकारात ठेवलेले आहे. ते ग्रामपंचायत कार्यालय ठेवणे बंधनकारक असताना सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयात ठेवले नाही. त्यामुळे तपासणी करता आलेली नाही. तसेच शेणित ग्रामपंचायतचे ७५ लाख ६९ हजार ५०४ रूपये तर आंबेवगण ग्रामपंचायतचे १८ लाख ४८ हजार १८८ रुपये असे या दोन ग्रामपंचायतीचा एकुण ९४ लाख १७ हजार ६९२ रुपयांचा अपहार केल्याचे दिसून येत असल्याची फिर्याद अकोले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी काशिनाथ धोडीराम सरोदे (वय ५१ रा. संगमनेर) यांनी राजूर पोलिसांत दिली आहे.

राजूर पोलिसांनी तत्कालीन ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव रणशिंग याच्या विरोधात भा. द. वि. कलम ४०९ प्रमाणे राजूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास स. पो. नि. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन खैरनार करित आहे.

Visit : Policenama.com