अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर भल्या पहाटे कारवाई ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन (शेख सिकंदर) – अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थीतीत महसुल विभागाने कारवाई केली. ही कारवाई शनिवारी पहाटे करण्यात आली. नायब तहसीलदार निकेतन वाळे यांच्या फिर्यादीवरून संबंधीतांवर पुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, पुर्णा तालुक्यातील नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची तक्रार महसूल विभागाकडे आली होती. त्यानूसार ताडकळस- पुर्णा रस्त्यावरील हटकरवाडी शिवारात गस्त घालत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना (एमएच 02 वायए 9841) या टीप्परमध्ये वाळू साठा आढळून आला. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानूसार कारवाई करण्यात आली.

महसुल विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत 2 लाख 57 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर नायब तहसीलदार निकेतन वाळे यांच्या फिर्यादीवरून संबंधीतांवर अवैध वाळू वाहतूक प्रकरणी पुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.