Lockdown : व्हिडीओ कॉलव्दारे आईनं घेतलं मुलाचं अंत्यदर्शन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र अनेक लोकांना लॉकडाऊनच्या काळात अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या संकटांदरम्यान मनाला चटका लावून जाणारी घटना विरार येथे घडली आहे. ही घटना अशी की एका घरात एकट्याच राहणाऱ्या एका 42 वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला, आणि या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीचे सर्व नातेवाईक हे दिल्ली आणि कोलकात्याला राहत असल्याने त्यांना विरारला येणं शक्य नव्हतं. त्यामुळे या व्यक्तीचे अंत्यसंस्कार हे कुटुंबियांच्या परवानगीने पोलिसांनीच केले. दरम्यान त्याच्या आईने आणि बहीण-भावांनी त्याला अखेरचा निरोप हा व्हिडिओ कॉलद्वारेच दिला.

हृदयविकाराच्या झटक्याने 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू विरारच्या फुलपाडा परिसरात बुधवारी सकाळी त्याच्या घरातच झाला होता. मृत व्यक्ती व्यवसायाने दलाल होता. तो एकटाच घरात राहत होता, बराच वेळ झाला तरीही तो बाहेर येत नसल्याने त्याच्या मित्रांनी खिडकीतून डोकावून पहिले असता तो मृत अवस्थेत त्यांना दिसला. त्यामुळे लगेचच विरार पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी लगोलग धाव घेतली आणि चौकशी सुरु केली. चौकशीदरम्यान समोर आले की तो एकटाच इथे राहत असून त्याचे सर्व कुटुंबीय, नातेवाईक हे दिल्ली आणि कोलकाता येथे राहतात. त्याच्या कुटुंबियांना पोलिसांनी संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान लॉकडाऊनमुळे त्यांना मुंबईत येणं शक्य नव्हतं. अखेर मृत व्यक्तीच्या भावाने पोलिसांनाच अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली आणि विरार पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सुभाष दादाराव शिंदे यांनी या अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि विरारच्या विराटनगर स्मशानभूमीत आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचारी शिंदे यांनीच अंत्यसंस्काराचा संपूर्ण खर्च केला. दरम्यान या व्यक्तीचा अंत्यविधीचा सर्व विधी आणि अंत्यदर्शन त्याची आई, भाऊ आणि बहिणीला व्हिडीओ कॉलद्वारे दाखवण्यात आला. या व्यक्तीचा अंत्यसंस्कार सुरू असताना त्याच्या आईचे अश्रू थांबता थांबत नव्हते.