‘कोरोनापा’सून दिलासा ? व्हायरसच्या लसीचं मनुष्यावर झालं ‘परिक्षण’, ‘संकेत’ खुपच चांगले मिळाले, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – जगभरात धुमाकुळ घातलेल्या कोरोनाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूवर लस शोधण्यात आली असून तिचा माणसांवरील प्रयोग यशस्वी झाला आहे. अमेरिकेतील रोश कंपनीने ही लस तयार केली आहे. मायक्रो सॉफ्टमधील एका इंजिनिअरने आपल्याला ही लस टोचून घेण्याची तयारी दर्शविली होती. त्याप्रमाणे त्याच्यासह ४ जणांवर हा प्रयोग करण्यात आला आहे.

जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे ७ हजारांहून अधिक जणांचा मृत्यु झाला असून किमान दीड लाख लोकांना त्याची बाधा झाली आहे. अमेरिकेत ८७ जणांचा मृत्यु झाला असून ४ हजार जण कोरोनाबाधित आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, कोरोनावर लस शोधण्याचे काम वेगाने सुरु आहे. या लसीचा माणसांवर प्रयोग करुन पाहण्यात आला आहे. तो सकारात्मक आला आहे. आता याच माणसांवर २८ दिवसांनंतर पुन्हा प्रयोग करण्यात येणार आहे. इतक्या वेगाने एखाद्या रोगावर लस शोधून काढण्याचा इतिहासातील पहिलाच प्रयोग आहे.

कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत ७ हजारांहून अधिक जणांचा मृत्यु झाला असून गेल्या २४ तासात ६३४ हून अधिक जणांचा मृत्यु झाला आहे. त्यात इटलीमध्ये सर्वाधिक ३४९ जणांचा मृत्यु झाला आहे.