सावित्रीबाईंचे जन्मगाव नायगावला पर्यटन स्थळाचा दर्जा

सातारा : पोलिसनामा ऑनलाईन – देशातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई यांचे जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील नायगावला ( ता.खंडाळा) महाराष्ट्र शासनाने ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. यामुळे आता नायगावच्या विकासाला चालना मिळणार आहे.

नायगावला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात यावा ही मागणी सातत्याने करण्यात येत होती. सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगावला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. या संबंधी आवश्यक पूर्तता करून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व प्रांताधिकारी संगीता चौगुले यांनी प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर केला होता.

त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून नायगावला ब गट पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. या दर्ज्यामुळे नायगावला विकास कामांसाठी तसेच पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.

3 जानेवारी ला म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. नायगावला पर्यटन स्थळात समावेश केल्याने नायगाव ग्रामस्थ आणि फुले प्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.