Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळे वृत्तपत्र उद्योगाचे  4 हजार कोटींचे नुकसान

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून बंद असलेलया वृत्तपत्र उद्योगाचे चार हजार कोटींचे नुकसान झाले आहे. सरकारने आर्थिक मदत दिली नाही तर हा उद्योग डबघाईस येणार आहे. तसेच पुढील सहा-सात महिन्यांत हे नुकसान 15 हजार कोटींपर्यंत जाणार आहे, असे इंडियन न्यूजपेपर सोसायटीने माहिती व प्रसारण मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

आयएनएसचे अध्यक्ष शैलेश गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे,  गेल्या दोन महिन्यांत वृत्तपत्र उद्योगाचे चार ते साडेचार हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असून सर्व अर्थकारणच ठप्प असल्याने त्याचा फटका या व्यवसायालाही बसला आहे. खासगी क्षेत्रातील जाहिराती बंद असून वृत्तपत्र उद्योगाचा तोटा पुढील सहा ते सात महिन्यांत 12 ते 15 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर वृत्तपत्र उद्योगास आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

वृत्तपत्र कागदावर लादण्यात आलेले पाच टक्के सीमा शुल्कही सरकारने रद्द करावे. वृत्तपत्रा उद्योगात 30 लाख कामगार व कर्मचारी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काम करीत असून त्यात पत्रकार, मुद्रक, विक्रेते व इतरांचा समावेश आहे. आयएनएस ही संस्था एकूण 800 वृत्तपत्रांचे प्रतिनिधित्व करते. या संस्थेच्या अंदाजानुसार वृत्तपत्र उद्योगातून 9 ते 10 लाख लोकांना प्रत्यक्ष व 18-20 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. गेल्या काही आठवडयांत वृत्तपत्रांची आर्थिक स्थिती खालावली असून त्यांना कर्मचार्‍यांचे वेतन देणे अवघड झाले आहे.