धक्कादायक ! ‘कोरोना’च्या भीतीमुळे गेवराईत पत्रकाराचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मित्र कोरोनाबाधित निघाल्याने आपल्यालाही कोरोना झाला असेल ? या भीतीनेच गेवराईतील पत्रकार संतोष भोसले यांचा काल जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. दोन दिवसापूर्वी त्यांची चाचणी नकारात्मक आलेली असतानाही बाधित मित्राबरोबर फिरल्याची भीती मनात कायम होती.
त्यामुळे प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

बीड जिल्ह्यातील गेवराई येथील पत्रकार संतोष भोसले मागील काही दिवसांपासून मित्राबरोबर शहरात फिरत होते. आठ दिवसापूर्वी सोबतच्या मित्राला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत उघड झाले. परिणामी आपल्यालाही लागण झाली असेल या भीतीने ते अस्वस्थ झाले. दोन दिवसापूर्वी त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आल्यानंतर अहवाल नकारात्मक आला.

तरीही ताप आणि अंगदुखीची लक्षणे दिसू लागल्याने ते अधिकच अस्वस्थ होत गेले. सोमवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान काल दुपारी त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी जाहीर केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि विवाहित दोन मुली असा परिवार आहे.