गणेशोत्सवाच्या काळात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता : हवामान विभाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये कोसळलेल्या  मुसळधार पावसाने राज्यात बहुतांश ठिकाणी पूरस्थिती निर्माण केली होती. पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने दीर्घकाळ दडी मारलेला पाऊस पोषक स्थितीमुळे पुन्हा सक्रिय झाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , पुढील 5 दिवस राज्यात काही ठिकाणी कमी-अधिक पावसाची शक्यता आहे. कोकणसह मुंबई, ठाण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून  पुढील 24 तासांमध्ये ते तीव्र होत जाण्याचे संकेत आहेत.

त्याचप्रमाणे अरबी समुद्रात समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे मध्य प्रदेश ते मध्य महाराष्ट्रादरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. या  स्थितीमुळे मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाट माथ्यावर  जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यतील घाट माथ्यावर  काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची चिन्हे आहेत. तसेच  जालना, परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यतही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.