कौतुकास्पद ! बस कंडक्टर पास झाला UPSC ची मुख्य परिक्षा, आता पुढचा थांबा IAS

बंगळुरू : वृत्तसंस्था – मनामध्ये इच्छा शक्ती असेल तर कोणतेही काम अवघड नसते. हेच एका बस कंडक्टरने करुन दाखवले आहे. बंगळुरू येथील बीएमटीसीच्या बसमध्ये कंडक्टर असलेल्या मधु एनसी याने आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर युपीएससीची मुख्य परीक्षा पास केली आहे. आपण एक अधिकारी होयचे या ध्येयाने पछाडलेल्या मधु यांनी हे यश संपादीत करून अनेक तरुणांसमोर एक आदर्श ठेवला आहे. आता मधु यांचा पुढचा स्टॉप असणार आहे तो म्हणजे IAS गाठण्याचा बंगळुरू बीएमटीसीमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या मधु यांना अधिकारी होण्याची इच्छा होती.

हीच इच्छा त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. त्यांनी कंडक्टरची नोकीर करत युपीएससीची मुख्य परिक्षा पास केली असून त्यांना आता त्यांचे ध्येय गाठण्यासाठी केवळ एकच स्टॉप शिल्लक आहे. त्यामुळे पढील स्टॉप IAS असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. युपीएससी परीक्षेसाठी 25 मार्च रोजी मधु यांची मुलाखत चाचणी घेण्यात येणार आहे. कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील मालावली या छोट्याशा खेड्यातील मधु यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.

जानेवारी महिन्यामध्ये युपीएससीचा निकाल लागला. निकालपत्रात त्यांनी आपला रोल नंबर पाहिला त्यावेळी त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. 29 वर्षीय मधु हे कुटुंबातील मोठा मुलगा असल्याने कुटुंबाची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे. कंडक्टरची नोकरी करत आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावत त्यांनी युपीएससीचा अभ्यास केला. अपार कष्ट, अभ्यासाची चिकाटी आणि इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी हा टप्पा गाठला आहे. मागील वर्षी जून मध्ये मधु यांनी युपीएससीची पूर्व परीक्षा दिली होती. यामध्ये यश मिळवल्यानंतर त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी सुरु केली.

मुख्य परीक्षेसाठी त्यांनी राज्यशास्त्र, मुल्य, भाषा, आंतरराष्ट्रीय विषय, सामान्य ज्ञान, गणित आणि निबंध लेखन या विषयांचा अभ्यास केला. कंडक्टरची नोकरी सांभाळत, कुटुंब सांभाळत त्यांनी यातून वेळ काढत अभ्यास केला. ते दररोज पाच तास अभ्यासासाठी देतात. युपीएससीची पूर्व परीक्षा त्यांनी त्यांच्या मातृभाषा कन्नड मधून तर मुख्य परीक्षा इंग्रजीतून दिली.

मधु यांनी राज्यशास्त्र विषयाचे पदवीधर आहेत. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी कंडक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. घरापासून शिक्षणासाठी दूर जावे लागत असताना आणि येणाऱ्या अडचणींचा सामाना करत त्यांनी आपले पदवीपर्य़ंतचे शिक्षण पूर्ण केले. मधु म्हणतात, माझ्या घरातून सर्वाधिक शिक्षण घेतलेला मीच आहे. मी कोणती परीक्षा पास केली, याबद्दल माझ्या आई-वडिलांना काहीच माहित नाही. पण मी कोणतीतरी परीक्षा पास केली, याचा त्यांना अत्यंत आनंद आहे. मधु यांना बंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचे सध्या व्यवस्थापकीय संचालक सी शिखा यांच्यासारखे सनदी अधिकारी व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले.