पुढील 3 दिवस उष्णतेची लाट राहणार, हवामान विभागाचा इशारा

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. अकोला जिल्ह्यात 1 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटची शक्यता आहे. पुढील तीन दिवस अकोला शहर व जिल्‍ह्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान तापमान वाढल्याने रस्ते निर्मनुष्य दिसू लागले असून बाजारपेठांमध्ये ही शुकशुकाट निर्माण झाला आहे.

गेल्या 8 दिवसांपासून विदर्भातील तापमानात चढ-उतार होत आहे. अकोल्यात गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहिल्याने उष्णता जाणवली नाही. मात्र शनिवारपासून पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे अकोल्याच्या तापमानाने चाळशी पार केली आहे. रविवारी (दि. 29) विदर्भात सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाच्या तापमानाची नोंद अकोल्यात झाली होती. वाढत्या तापमानाचा आरोग्यावरही परिणाम होत आहे. उन्हाची लाट आणखी 3 दिवस राहणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. गेल्यावर्षी आणि त्यापूर्वी 2019 मध्ये 30 मार्च ते 4 एप्रिल या काळात विदर्भासह अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवली होती. या काळात दोन्ही वर्षी तापमान 44 ते 46 अंश सेल्सिअस होते. यंदाही पुन्हा 1 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा नागपूर वेधशाळेने दिला आहे.