पुढील आठवड्यात 4 दिवस बँका राहू शकतात बंद, लवकर उरका सर्व कामे, अन्यथा होईल अडचण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील आठवड्यात बँकांचा संप आणि बँकांच्या अन्य सुट्ट्यांमुळे बँकिंग शाखा केवळ तीन दिवस खुल्या राहणार आहेत. बँकांच्या विलिनिकरणाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारने नुकतेच सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँका एकत्र करून चार बँका करण्याच्या निर्णयावर अंतिक शिक्कामोर्तब केले होते. हा निर्णय एक एप्रिल पासून लागू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

या दिवशी बंद राहतील बँका
सोमवार आणि मंगळवारी बँका उघड्या राहतील. बुधवार म्हणजे 25 मार्च 2020 ला गुढीपाडवा, नवरात्र, तेलगू नववर्ष आणि उगादी सणामुळे बेलापुर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू, मुंबई, नागपुर, श्रीनगर आणि पणजीमध्ये बँका बंद राहतील.

त्यानंतर बँका गुरूवारी पुन्हा उघडतील. शुक्रवार 27 मार्च 2020 ला बँकांचा संप आहे. तर 28 मार्च 2020 ला चौथा शनिवार आणि 29 मार्चला रविवार आहे. यासाठी भारतातील सर्व बँकांना सुट्टी आहे.

11 मार्चला सुद्धा केली होती संपाची घोषणा
यापूर्वी 11 मार्चला सुद्धा यूनियन्सने तीन दिवसीय देशव्यापी संपाची घोषणा केली होती. परंतु नंतर बँक कर्मचार्‍यांनी हा संप टाळला. संघटनेने म्हटले की, मुंबईत भारतीय बँक संघटनेसोबत (आयबीए) झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने संप स्थगित केला आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये केली होती विलिनिकरणाची घोषणा
सरकारने मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचे चार बँकांमध्ये विलिनिकरण करण्याचा निर्णय घेतला होता. यूनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरियंटल बँक ऑफ कॉमर्सचे विलिनिकरण पंजाब नॅशनल बँकेत होणार आहे. या विलिनिकरणानंतर पीएनबी या वर्षी 1 एप्रिलला भारतातील दुसरी सर्वात मोठी बँक होईल. याशिवाय सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँक आणि अलाहबाद बँकेचे इंडियन बँकेत विलिनिकरण होणार आहे. अशाच प्रकारे आंध्रा बँक तथा कॉरर्पोरेशन बँकेचे युनियन बँक ऑफ इंडियात विलिनिकरण होणार आहे.