मलनिस्सारण केंद्रात विषारी गॅसमुळे तीन मजुरांचा मृत्यू

मीरा रोड : पोलीसनामा ऑनलाइन – मल निस्सारण केंद्रात विषारी गॅसमुळे 3 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडच्या शांती गार्डन जवळील मलनिस्सारण केंद्रात ही घटना घडली आहे. यात एक मजुर जखमी झाल्याचे समोर आले आहे. आज दुपारी 2 च्या सुमारास पाच मजूर मलनिस्सारण केंद्राच्या टाकीत वॉल खोलण्यासाठी उतरले होते. विषारी गॅसमुळे यातील मुझफ्फर मोहलिक (वय 24), रफिक मंडल (वय 50), मफिजूल (वय 40) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आफतार मुल्ला (वय 40) हा जखमी झाल्याचे समोर आले आहे.
नेमकी घटना काय ?
शांती गार्डन जवळील मलनिस्सारण केंद्राची ही टाकी गेल्या अनेक दिवसांपासून बंदच होती. त्यामुळे या टाकीत मोठ्या प्रमाणात विषारी गॅस जमा झाला होता. दरम्यान आज दुपारी 2 च्या सुमारास सदर कामगार वाॅल खोलण्यासाठी गेले होते. यासाठी टाकीत उतरले होते. त्यांचे काम करून ते बाहेर पडले. व दुपारी जेवणासाठी निघाले. यातील एक कामगार मात्र अद्याप टाकीतच आपले सफाईचे काम करत होता. त्या कामगाराला अचानक अस्वस्थ वाटू लागले व तो तिथेच कोसळला. त्याच्या मदतीसाठी म्हणून बाहेर आलेले अन्य कामगार पुन्हा आत उतरले. यातील विषारी गॅसचा चारही मजूरांवर परिणाम झाला.
यातील वायूमुळे त्यातील तिघे जागीच दगावले. यातील एक जखमी झाला होता. मीरा रोडच्या भक्तीवेदांत रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इतर मृतांना बाहेर काढण्यात आले आहे.